पुणे

स्वच्छतेत २० टक्के कामचोर ; आयएसडब्ल्यूएमएसमुळे कामचुकार उजेडात

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कचरासंकलन, वाहतूक आणि स्वच्छता कर्मचार्‍यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने अवलंबलेल्या इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयएसडब्ल्यूएमएस) या डिव्हाईसमुळे दररोज सरासरी 20 टक्के कामचुकार कर्मचार्‍यांची पोलखोल होत असून, कामावर न येता हजेरी लावणार्‍यांची चोरी पकडली जात आहे. याच प्रणालीला कामाचा वेळ व हजेरी संलग्न केल्याने कामचुकारांच्या गैरहजेरीची नोंद होत आहे.

परिणामी, कामचुकारांमध्ये प्रचलित असलेल्या बंद घर संकल्पनेला चाप बसला आहे. महापालिकेकडून शहरात कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. यामध्ये झाडण काम, ड्रेनेज सफाई करणारे बिगारी, झाडू काम, घाणभत्ता अशा कर्मचार्‍यांचा समावेश आहे. हे कर्मचारी महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी दर 15 ते 20 कर्मचार्‍यांमागे एका मुकादम आणि निरीक्षकाची (एसआय) नेमणूक केली जाते. या कर्मचार्‍यांचे काम पहाटेपासून सुरू होत असल्याने त्यांची हजेरी मस्टर पद्धतीने नोंदविली जाते. याचाच फायदा घेऊन अनेक जण कामावर न जाताच पगार लाटतात.

या कर्मचार्‍यांना बंद घर अशा कोडवर्डने ओळखले जाते. एका कर्मचार्‍याकडून महिन्याला 7 ते 8 हजार रुपये मिळत असल्याने मुकादम आणि निरीक्षकांकडून कामचुकारांना साथ मिळते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये किमान 30 ते 35 कर्मचारी कामावर न येताच पगार घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिमचा (आयएसडब्ल्यूएमएस) अवलंब करून 13 हजार स्वच्छता कर्मचार्‍यांना डिव्हाईस दिले आहे. याशिवाय कचरा वाहतूक करणार्‍या 700 वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग्ज व जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

याचा नियंत्रण कक्ष (कमांड कंट्रोल रूम) एलबीटी भवनमध्ये आहे. सुरुवातीला ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट म्हणून बाणेर औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात वापरण्यात आली. त्यानंतर संपूर्ण शहरात लागू करण्यात आली. या प्रणालीमुळे दररोज सरासरी 20 टक्के कर्मचारी कामावर येत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. कामाचा वेळ व हजेरी डिव्हाईसला संलग्न केल्याने या कर्मचार्‍यांची हजेरी लागत नाही. पूर्वी मात्र हे कर्मचारी महिनाभर कामावर असल्याची नोंद असायची. नव्या डिव्हाईसमुळे 20 टक्के कर्मचार्‍यांची कामचोरी पकडली जात असल्याने महापालिकेचा पैसा वाचत आहे.

डिव्हाईसच्या माध्यमातून काय कळते…

  • संबंधित कर्मचारी किती
  • वाजता कामावर आला
  • किती वाजता काम सुरू केले
  • किती वेळ तो ठरवून दिलेल्या
  • परिसरात काम करीत होता
  • शहरात कुठे किती
  • कचरा तयार होतो
  • स्वच्छच्या माध्यमातून किती घरांमधील कचरा संकलित केला
  • कचरा वाहतूक करणार्‍या गाड्या किती ठिकाणांवर (पॉइंट्स) जाऊन कचरा संकलन करतात
  • किती कचरा प्रक्रिया केंद्रांवर येतो
  • किती कचर्‍यावर प्रक्रिया झाली

कामगार संघटनांचा विरोध

आयएसडब्ल्यूएमएस डिव्हाईसमुळे कामचुकार कर्मचार्‍यांची कामचोरी पकडली जात आहे. त्यामुळे कर्मचारी डिव्हाईस चार्जिंग न करणे, त्याचे चार्जिंग सॉकेट तोडणे, असे प्रकार करतात. यावरही प्रशासनाने उपाय काढल्यानंतर हे कर्मचारी सदर प्रणाली बंद करण्यासाठी कामगार संघटनांना पुढे करीत आहेत. महापालिकेच्या कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ही प्रणाली बंद करण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम ही प्रणाली संपूर्ण शहरात लागू केली आहे. यामुळे घनकचरा विभागाच्या हजेरीच्या नोंदणीची अडचण दूर झाली आहे. तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम अधिक सुलभ होण्यास मदत होत आहे. या प्रणालीमुळे कामचुकारांनाही चाप बसत आहे.

– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

पगार महापालिकेचा अन् कामे माननीयांची

महापालिकेचे अनेक बिगारी रात्रंदिवस आजी-माजी माननीयांची व्यक्तिगत व घरगुती कामे करतात. यामध्ये कायमस्वरूपी कर्मचार्‍यांपेक्षा कंत्राटी कर्मचार्‍यांची मोठी संख्या आहे. अनेक माननीयांच्या संपर्क कार्यालयामध्ये काम करणारे पालिकेचे बिगारी असतात. अनेक जण माननीयांच्या आर्थिक व्यवहारासह त्यांचा सोशल मीडिया संभाळण्याचे काम करतात. त्यामुळे पगार पालिकेचा आणि काम मात्र माननीयांचे, असे चित्र सर्वत्र आहे. आता महापालिका प्रशासन या कर्मचार्‍यांना आयएसडब्ल्यूएमएस प्रणालीत आणते का? हे पाहावे लागणार आहे. यावर विरोधकही 'ब्र' काढत नाहीत.

परस्पर ठेवले जातात बदली कामगार

महापालिकेमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी आहेत, त्यातील अनेक जण स्वतः कामावर न येता परस्पर आपल्या नावावर दुसर्‍याला कामाला पाठवतात. या प्रकाराला नवीन आयएसडब्ल्यूएमएस प्रणाली कसा चाप घालणार? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT