पुणे

पिंपरी : दोन हजार 400 कुटुंबीयांना मिळाले पीएमआरडीएचे घर

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 येथील दस्त नोंदणी झालेल्या तीन हजारांपेक्षा अधिक घरांपैकी 2 हजार 400 कुटुंबीयांना आतापर्यंत घराचे ताबे देण्यात यश आले आहे. गेल्या 11 दिवसांपासून ही कार्यवाही सुरू आहे. पीएमआरडीएकडून पेठ क्रमांक 12 मध्ये 4 हजार 883 घरांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यापैकी तीन हजार 50 नागरिकांनी 31 मे पूर्वी घरांचे सर्व हप्ते भरले आहेत. तसेच, दस्त नोंदणीप्रक्रिया पूर्ण केली आहे.

त्यांना इमारतनिहाय घरांचे ताबे देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. या कार्यवाहीला 6 तारखेपासून सुरुवात झाली. 19 तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत 1 ते 6 मजल्यावरील आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीत 7 ते 11 मजल्यापर्यंत सदनिकांचा ताबा दिला जात आहे. सध्या घरांचा ताबा देण्याची कार्यवाही सुरू असतानाच दस्त नोंदणीची प्रक्रियादेखील केली जात आहे. ज्या नागरिकांची दस्त नोंदणी प्रक्रिया 31 मे नंतर झालेली आहे त्यांना 19 जूनपर्यंत वेळापत्रकानुसार निश्चित कार्यक्रम पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसाने घरांचे ताबे मिळणार आहेत.

पीएमआरडीएच्या वतीने पेठ क्रमांक 12 येथील 2 हजार 400 सदनिकांचे ताबे आतापर्यंत लाभार्थी नागरिकांना देण्यात आले आहेत. 19 तारखेपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार ही कार्यवाही चालणार आहे.

कोणत्या कागदपत्रांची गरज?

घराचा ताबा घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांनी सोबत अंतिम वाटपपत्र, आधारकार्डची मूळ प्रत ही कागदपत्रे आणणे गरजेचे आहे. घराचा ताबा घेण्यासाठी मूळ अर्जदार अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास सहअर्जदार यांच्या नावाने नोंदणीकृत पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करून दिली असल्यास सहअर्जदारास सदनिकेचा ताबा दिला जात आहे.

जे लाभार्थी नागरिक घरांचा ताबा घेण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार 19 तारखेपर्यंत उपस्थित राहू शकणार नाही. त्यांना 19 जूननंतर पुढील तीन-चार दिवसाने ताबा देण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच, ज्या नागरिकांचे त्यानंतरही घराचे ताबे बाकी राहतील, त्यांच्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून कामकाज केले जाईल.

                                    – बन्सी गवळी, सहआयुक्त, पीएमआरडीए

हेही वाचा

SCROLL FOR NEXT