पुणे

गुन्हेगारीच्या अंधारात शिक्षणाचा दिवा! 2 हजार 173 कैद्यांनी घेतले शिक्षण

अमृता चौगुले

महेंद्र कांबळे :

पुणे : रागाच्या भरात, कोणाच्या संगतीने गुन्हा केलेल्यांना त्याबद्दल कालांतराने शिक्षा होते. जेव्हा चांगल्या चांगल्या मार्गातून आयुष्याला दिशा देण्याची वेळ असते, अशावेळी अचानक गुन्हा घडून मार्ग बदलतो. हा मार्ग अत्यंत बिकट आणि अंधारलेला होऊन जातो. अशा
अंधारलेल्या वाटेवर शिक्षण हे कैद्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षा संपवून बाहेर पडलेले कैदी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चांगल्या मार्गाने आपले जीवन सुखकर व्हावे, यासाठी शिक्षणाची कास धरताना दिसत आहेत.

2014 ते 2022 या कालावधीत 2173 पुरुषांनी, तर 110 महिलांनीदेखील कारागृहातून शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे म्हणून काम करत असताना कैद्यांना शिक्षा उपभोगल्यानंतर मुख्य प्रवाहात सामावून घेतले जावे, यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यातील कैद्यांचे शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे. सध्या कारागृहातील कैद्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (नवी दिल्ली) या विद्यापीठांनी शिक्षणाचे दालन उघडे केले आहे. यामध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण, डिप्लोमा व इतर शिक्षणासाठी कैदी पुढे येत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून 2014 ते 2012 दरम्यान 637 पुरुषांनी तसेच 27 महिला कैद्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले, तर सहा कैद्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. डिप्लोमा 46 पुरुष कैद्यांनी पूर्ण केला, तर इतर अभ्यासक्रम 1191 कैद्यांनी तर 70 महिलांनी पूर्ण केला आहे.

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून 63 पुरुष कैद्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण 68 पुरुष आणि 2 महिला कैद्यांनी पूर्ण केले, तर डिप्लोमा अभ्यासक्रम 60 पुरुष कैद्यांनी, तर दोन महिलांनी पूर्ण केला. इतर अभ्यासक्रम 102 पुरुष कैद्यांनी, तर 9 महिलांनी पूर्ण केला.

सुधारणेचे विविध प्रयत्न
महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यापासून प्रभावीपणे विविध उपक्रम राबविले जात आहेत. कारागृतील बंदिजनांसाठी स्मार्टकार्ड फोन सुविधा, परदेशी कैद्यांसाठी व्हिडीओ कॉलची सुविधा, अभंग स्पर्धा, आरोग्य शिबिरे, तणावमुक्तीपर व्याख्यान इत्यादी महत्त्वपूर्ण उपाययोजना तसेच कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्रोन कॅमेर्‍याद्वारे ठेवण्यात येणारे लक्ष, असे विविध उपक्रम सध्या कारागृहात राबविले जात आहेत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT