पुणे

बिल्डर ‘डीएसकें’वर सीबीआयकडून 2 गुन्हे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'घराला घरपण' देण्याचे स्वप्न दाखवणारे पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरोधात सीबीआयने शुक्रवारी (दि. 14) दोन गुन्हे दाखल केले आहेत. गुंतवणूक दारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंविरोधात 580 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कधीकाळी पुण्यात बांधकाम व्यवसायात मोठे नाव असलेल्या डीएसकेंवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

1 जुलै 2020 रोजी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यानुसार, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय आदी बँकांनी कुलकर्णी यांच्या कंपनीला 650 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यातील 433 कोटी रुपयांचे कर्ज थकवण्यात आले. तर दुसर्‍या प्रकरणात सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने 1 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या लेखी पत्रानुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा डीएसके समूहाची उपकंपनी असलेल्या डीएसके ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीने अंदाजे 156 कोटी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने त्यांच्या लेखा अहवालात जारी केल्याप्रमाणे उत्पन्नातील 60 टक्के रक्कम कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च करण्यात आली. मात्र, कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात तशी कोणतीही नोंद आढळून आली नाही. ज्या उद्देशासाठी कंपनीला कर्ज दिले होते त्याऐवजी कंपनीने कर्जातून मिळालेली रक्कम मूळ कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर स्टेट बँकेने केलेल्या फोरेन्सिक ऑडिटमध्ये कंपनीत मोठ्या प्रमाणावर व्हेंडर कंपन्यांसोबत त्यांनी पैशांचा व्यवहार केल्याचे दाखवण्यात आले आहे, पण ज्या कंपन्यांना त्यांनी हे पैसे दिल्याचा दावा केला, त्या कंपन्यांचा पत्ता व त्या अस्तित्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT