पुणे

पुणे : विविध सीईटींसाठी अडीच लाख अर्ज

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करीत आहेत. बहुतांश प्रवेश परीक्षांसाठी मुदत 18 मार्चपर्यंत आहे. आतापर्यंत 9 सीईटीसाठी 2 लाख 50 हजार अर्ज, तर एमएचटी सीईटीसाठी आतापर्यंत 61 हजार अर्ज आल्याचे सीईटी सेलने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणार्‍या विविध विषयांच्या 18 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतल्या जाणार आहेत. या सर्व परीक्षा, त्यांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि एकूण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामधील एमएचटी सीईटी, एमबीए/ एमएमएस, फाईन आर्टस्, बी. ए. बी. एड., बी. एस्सी. बी. एड., एलएल. बी. 3 आणि 5 वर्षे, एमसीए, बी. पी. एड., एम. एड., एमपी. एड., बी. एड. (जनरल) या अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

एमबीएची अर्ज नोंदणी शनिवारी संपली असून, इतर अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी सुरू आहे. सीईटी परीक्षा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली जात आहे. आतापर्यंत नोंदणी सुरू झालेल्या 9 अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी राज्यातून 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरून अर्जनोंदणी निश्चित केली आहे. या सीईटी परीक्षांसाठी केवळ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 35 हजारांवर पोहचली आहे. 18 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

एमबीए प्रवेशासाठी चुरस वाढणार…
एमबीए प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 11 मार्चला संपली. यंदा एमबीए, एमएमएससाठी 1 लाख 50 हजार 707 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 31 हजार 19 विद्यार्थ्यांनी पैसे भरून अर्ज पूर्ण केले आहेत. त्यामुळे यंदा एमबीए प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT