पुणे : भारतीय वायूसेनेचे शौर्य आणि धैर्याचे प्रतीक, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या कैदेतून धाडसी सुटका करून घेणारे निवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर (वय ८२) यांचे रविवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासातील एक सोनेरी पान हरपले आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
मार्च १९६३ मध्ये वायूसेनेत दाखल झालेले पारुळकर हे एक धडाडीचे आणि कर्तृत्ववान अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अतुलनीय शौर्याची गाथा केवळ एका युद्धापुरती मर्यादित नव्हती.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ग्रुप कॅप्टन पारुळकर यांनी नऊ यशस्वी उड्डाणे केली. मात्र, दहाव्या मोहिमेवेळी त्यांचे विमान लाहोरजवळ शत्रूने पाडले. त्यांना युद्धकैदी म्हणून रावळपिंडीच्या छावणीत ठेवण्यात आले. पण हार मानणे त्यांच्या स्वभावात नव्हते. १९७२ मध्ये त्यांनी फ्लाइट लेफ्टनंट एम. एस. ग्रेवाल आणि फ्लाइट लेफ्टनंट हरीश सिंह यांच्यासोबत अत्यंत धोकादायक परिस्थितीत तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखली आणि यशस्वी करून दाखवली. त्यांच्या याच धाडसी सुटकेवर आधारित 'द ग्रेट इंडियन एस्केप' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 'विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले.
त्याआधी १९६५ च्या युद्धातही त्यांनी आपल्या शौर्याचा परिचय दिला होता. शत्रूच्या गोळीबारात त्यांचे विमान सापडले आणि त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विमानातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी अविश्वसनीय धैर्य दाखवत गंभीर नुकसान झालेले विमान सुरक्षितपणे भारतीय तळावर परत आणले. या पराक्रमासाठी त्यांना 'वायू सेना पदकाने' सन्मानित करण्यात आले होते.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी एअर फोर्स अकादमीमध्ये 'फ्लाइंग इन्स्ट्रक्टर' म्हणूनही सेवा बजावली. त्यांच्या निधनाने भारतीय वायूसेनेने एक धडाडीचा आणि प्रेरणादायी योद्धा गमावला आहे, ज्यांचे शौर्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहील.