बारामती: होळ (ता. बारामती) येथील पियुष विजय भंडलकर या नऊवर्षीय बालकाचा निर्दयी पित्यानेच गळा दाबून व त्यानंतर भिंतीवर डोके आपटून खून केला. खुनाच्या घटनेनंतर परस्पर अंत्यविधी उरकण्याची तयारीसुद्धा केली. परंतु, वडगाव निंबाळकर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत अंत्यसंस्कार रोखला. मृतदेहाचे शवविच्छेदन करत पियुषचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे उघड केले. या प्रकरणातील तिघांना 12 तासांत जेरबंद करत गुन्ह्याची उकल केली.
पियुषचे वडील विजय गणेश भंडलकर, आजी शालन गणेश भंडलकर आणि चुलत चुलता संतोष भंडलकर या तिघांना पोलिसांनी अटक केली. विजय याने पियुष याचा खून केला. त्यानंतर या दोघांच्या साथीने त्याला चक्कर आल्याचे भासवत निरा येथील दवाखान्यात नेले.
डॉक्टरांनी तपासून पियुष याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह न्या, असेही सांगितले. तरीही या तिघांनी नातेवाईकांना पियुष हा चक्कर येऊन पडल्याने मयत झाला असल्याचे सांगत अंत्यविधीची तयारी केली.
वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तत्काळ वरिष्ठांना याची माहिती दिली. वरिष्ठांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार काळे यांनी होळ येथील स्मशानभूमीत पोलिस पथक पाठवले. पोलीस आल्यानंतर तेथे नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह हलविण्यास नकार दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला.
उत्तरीय तपासणीत पियुषच्या गळ्यावर दाब दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. परंतु, या अभिप्रायाबाबत गुप्तता ठेवून पोलिसांनी पियुषचा अंत्यविधी होण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर एकेक संशयित ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी करत खुनाचा प्रकार उघडकीस आणला.