पुणे

19 लाखांचा गंडा घालणारा गजाआड; शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आभासी चलनात (बिटकॉइन) गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका खासगी कंपनीतील कर्मचार्‍याची 19 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला शिवाजीनगर पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सात मोबाईल, दहा सीमकार्ड, बँकांची खाते पुस्तिका, आठ डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल (वय 34, रा. द मिस्ट सोसायटी, इंदिरानगर, दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी शनिवार पेठेतील 36 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, रंजीत जनरैल सिंह (वय 37, रा. हेरिटेज शांग्रिला, मीरा रोड, जि. ठाणे), शब्बीर शेख (वय 41, रा. निर्मलनगर, मीरा रोड, जि. ठाणे), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर), मंगेश कदम (रा. गोखलेनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शनिवार पेठ भागात राहायला असून, शिवाजीनगर भागात त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी मुकुल त्यांच्या संपर्कात आला होता. आभासी चलन खरेदी- विक्री करणार्‍या कंपनीतील प्रतिनिधी असल्याची बतावणी त्याने फिर्यादींकडे केली होती. त्यानंतर कंपनीतील प्रतिनिधी असल्याचे सांगून आरोपी रंजीत, शब्बीर, सुजॉय, मंगेश फिर्यादींना भेटले. त्यांनी फिर्यादींना गुंतवणुकीचे आमिष दाखवून तीन बिटकॉईन देतो असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी फिर्यादींकडून 19 लाख 70 हजार रुपय घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे फिर्यादींना बिटकॉईन दिले नाहीत. त्यांनी आरोपींकडे बिटकॉ़ईनची मागणी केली असता, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी मुकुल मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, तो राहण्याची ठिकाणे तसेच मोबाईल क्रमांक बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा समजला नव्हता. तांत्रिक तपासात मुकुल कर्जत परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आदेश चलवादी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून सात मोबाईल ,दहा सीमकार्ड, आठ डेबिटकार्ड, एक क्युआर कोड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, अर्जुन कुडाळकर, रुचिका जमदाडे आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT