राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणार्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाच्या कामासाठी राज्य सरकार 150 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. स्मारक समिती गठीत करण्यात आली असून, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नियोजित कामाचा आराखडा तयार करण्यासाठी तातडीने पाहणी होणार आहे. हा आराखडा 31 मेपर्यंत सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
हुतात्मा राजगुरू यांच्या 92 व्या बलिदान दिनानिमित्त राजगुरुनगर येथे गुरुवारी (दि 23) अभिवादन करण्यात आले. राजगुरुनगर बस स्थानकासमोरील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या वेळी आढळराव पाटील बोलत होते. माजी आमदार सूर्यकांत पलांडे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल तांबे पाटील, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, सतीश राक्षे, विजयाताई शिंदे, शांताराम घुमकर, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, बाळासाहेब सांडभोर, कोंडीबा टाकळकर, अॅड. मुकुंद आवटे, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, बँक संचालक दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर यांसह महात्मा गांधी विद्यालय, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले.
राजगुरू वाड्यावर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य शरद बुट्टे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, शांताराम भोसले, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे आदी या वेळी उपस्थित होते. वाड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.