पुणे: ऊस गाळप हंगाम 2024-25 मधील शेतकर्यांच्या उसाची रास्त आणि एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी 15 साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
एफआरपीच्या विलंबित कालावधीसाठी 15 टक्के व्याजासह एफआरपीची रक्कम देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्यांवर रक्कम वसुलीची जबाबदारी देण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.
त्यामध्ये सर्वाधिक नऊ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील असून, धाराशिव एक, अहिल्यानगर व सातारामधील प्रत्येकी दोन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील एका कारखान्याचा समावेश आहे. तसेच, जप्तीच्या कारवाईमध्ये 12 खासगी आणि तीन सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नुकतीच साखर आयुक्तांची भेट घेतली होती. दरम्यान, थकीत एफआरपीप्रश्नी संबंधित कारखान्यांची सुनावणीत बाजू ऐकून घेतली होती. तरीसुद्धा उसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) संबंधित कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, असे साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी सांगितले.