पुणे

1400 पुणेकर ‘गंडले’; सायबर ठगांकडून ऑनलाईन गंडा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सायबर चोरट्यांनी ऑनलाईन व्यवसायाचा बहाणा करून चार महिन्यांत तब्बल 1400 पुणेकरांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. त्यामध्ये ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या (Online Sale and Purchase Fraud) माध्यमातून होणार्‍या फसवणुकीचे प्रमाण मोठे असून, दुसरा क्रमांक ओएलएक्स फ्राडचा लागतो.

सायबर पोलिसांच्या आवाहनानंतरदेखील किरकोळ चुका व प्रलोभनाला बळी पडून नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद अडकत असल्याचे वास्तव आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे जगातील माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागली. व्यावसायिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर केला जात आहे.

अनेक उद्योजकांनी आपल्या व्यावसायिक सुविधा ग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकदेखील या सेवांचा मोठा फायदा घेत आहेत. ऑनलाईन व्यावसायिक क्षेत्राचा वाढता आवाका पाहता, सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचतात. त्यासाठी त्यांच्याकडून विविध मोड्स वापरल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यातील क्राइम म्हटल्या जाणार्‍या सायबर गुन्हेगारीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

फसवणूक होणार्‍यामध्ये सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. चालू वर्षातील मे अखेरपर्यंत 1400 पेक्षा अधिक पुणेकर नागरिकांची सायबर चोरट्यांनी व्यवसायाच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या तक्रारी सायबर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गेल्या वर्षी (2021) 15 एप्रिलपर्यंत 997 जणांची या माध्यमातून फसवणूक झाली होती.

यंदा या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. दररोज 11 पेक्षा अधिक नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे वास्तव आहे. त्यामध्ये ऑनलाईन खरेदी विक्रीच्या बहाण्याने करण्यात आलेल्या फसवणुकीचा आकडा 1 हजार 20 च्या घरात आहे. तर ओएलएक्स फसवणुकीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीचा आकडा 343 आहे.

ओएलएक्स फसवणुकीच्या बाबतीत थोडी-फार जागृती झाल्यामुळे मागील काही दिवसांत हे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. तर, खरेदी-विक्रीच्या बाबतीत पूर्वी सायबर चोरटे वस्तू विक्री करण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करत होते. मात्र, त्या बाबतीत नागरिक जागृत झाल्यानंतर, त्यांनी व्यावसायिकांकडील वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

या दोन्ही फसवणुकीच्या प्रकरणात लिंकद्वारे पैसे पाठवल्याचे सांगून समोरील व्यक्तीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरी करून खात्यावर हात साफ केला जात आहे. अनेकदा नागरिकांनी वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा दहा पट पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली केल्याची उदाहरणे आहेत.

1020 ऑनलाइन खरेदी विक्री फसवणूक
01 फ्लिपकार्ट फसवणूक
343 ओएलएक्स फसवणूक
02 मल्टिलेव्हल मार्केटिंग                                                                                                                                                  10 क्विकर फसवणूक

व्यवसायात ऑनलाईन खरेदी-विक्री करताना पूर्ण खात्री केल्याशिवाय थेट आर्थिक व्यवहार करणे टाळावे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता ती संस्था खरोखरच अस्तित्वात आहे का, याची खात्री करावी. योग्य खबरदारी घेतली, तर होणारी फसवणूक टाळता येते.

                                                     – डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर

जाहिरातीच्या बाबतीत संपर्क साधल्यास, कोणतीही व्यक्ती समोर भेटल्याशिवाय व्यवहार करणे टाळा. समोरील व्यक्तीने आमिष दाखवले, तर बळी न पडता बँकिंगचे किंवा वॉलेटचे डिटेल्स पाठवू नका. जो नंबर जाहिरातीवर वापर करणार आहात तो, शक्यतो बँक आणि वॉलेटबरोबर जोडलेला नसावा. संकेतस्थळावर जाहिरात टाकताना आपला मोबाईल नंबर शक्यतो डिस्प्ले करू नये.

                                                                 – अविराज मराठे, सायबरतज्ज्ञ

SCROLL FOR NEXT