पुणे

एसटीचे पुणे विभागातील 14 कर्मचारी पुन्हा कामावर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: संपकाळापासून एसटीच्या पुणे विभागात निलंबित असलेले 14 कर्मचारी आता लवकरच पुन्हा कामावर हजर होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना कामावर घेण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, सातवा वेतन आयोग लागू व्हावा, या मागण्यांकरिता एसटी कर्मचार्‍यांनी पाच ते सहा महिने सलग संप पुकारला. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने बेकायदा संपावर गेल्याचा ठपका ठेवत संपातील कर्मचार्‍यांना निलंबित केले होते.

दरम्यान, महामंडळाने कर्मचार्‍यांना अनेकदा कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, काही कर्मचारी हजर झाले, तर काही हजर झाले नाहीत. जे कर्मचारी हजर झाले नाहीत, त्यांना एसटी प्रशासनाने अद्याप निलंबित ठेवले आहे. विभागातील विविध आगारांतील 14 कर्मचारी सध्या निलंबित आहेत. त्यांना आता लवकरच पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे. परंतु, आता त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात येणार की सध्या आहे तेथूनच त्यांची सेवा सुरू करण्यात येणार, हे आता पाहावे लागणार आहे.

पुणे विभागातील एकूण एसटी कर्मचारी संख्या

चालक-1399
वाहक-1256

कार्यालयीन/अभियांत्रिकी कर्मचारी-1595

विभागातील एकूण कर्मचारी – 4 हजार 250

विभागातील निलंबित कर्मचारी संख्या

डेपो/आगार निलंबित कर्मचारी संख्या
स्वारगेट 2
राजगुरुनगर 6
नारायणगाव 1
शिवाजीनगर 2
पिंपरी-चिंचवड 3
विभागातील एकूण निलंबित 14

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठकीदरम्यान दिलेल्या आदेशाची माहिती मिळाली आहे. आता एसटीच्या मुंबईतील मुख्यालयातून आम्हाला आदेश प्राप्त झाल्यावर विभागात निलंबित 14 कर्मचार्‍यांना कामावर हजर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल.

                                – अ‍ॅड. सचिन भुजबळ, कामगार अधिकारी, एसटी, पुणे विभाग

SCROLL FOR NEXT