पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. संग्रहालयाचे नूतणीकरण व सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. आता पुन्हा नव्याने 14 कोटींची निविदा काढत ठेकेदार पोसण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये नव्याने काढलेल्या या निविदेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या कामामुळे आणखी वर्षभर तरी प्राणिसंग्रहालयास टाळे कायम राहणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयास टाळे कायम आहे. कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पर्यटन बंद असून, पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच, छोट्या जागेत असलेल्या प्राणी, पक्षी व सर्पाचे हाल सुरू आहे. यासंदर्भात 'पुढारी'ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणी वाचा फोडली आहे.
कासवगतीने काम
एमआयडीसीच्या 7 एकर जागेमध्ये सर्पोद्यान आहे. तेथे छोट्या आकाराचे प्राणिसंग्रहालय सुरू करण्यास केंद्रीय प्राधिकरणाने महापालिकेला मान्यता दिली आहे. त्यामुळे याठिकाणी प्राणिसंग्रहालय करण्याच्या कामास पालिकेने सुरुवात केली. त्याची मुदत ऑक्टोबर 2018 पर्यंत होती. मात्र, ठेकेदाराच्या कासवगतीमुळे संग्रहालयाचे काम पूर्ण झाले नाही. उलटपक्षी ठेकेदाराला वारंवार मुदतवाढीची बक्षिसी देण्यात आली.
मार्च 2023 संपत आले असतानाही अद्याप संग्रहालयाचे काम पूर्ण झाले नाही. तर, सुशोभीकरणाच्या नावाखाली आणखी 13 कोटी 99 लाख 4 हजार 739 रुपयांची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्राणी संग्रहायलाचे काम पूर्ण होऊन ते खुले न होता. केवळ नवनवीन कामे काढले जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
प्राणी, पक्षी व सर्पांना आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्याचे अखेरच्या टप्प्यातील कामाची निविदा आता काढली आहे. त्यात सुशोभीकरणाचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्यविषयक कामे करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आले. प्राणिसंग्रहालयात आवश्यक असलेली कामे केली जात आहेत. नवीन कामाची मुदत 9 महिने आहे. त्यानंतर संग्रहालय खुले केले जाईल.
– शेखर सिंह, आयुक्त