बारामती : पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकाला पकडण्यात सुपे पोलिसांना यश आले. या दरोडेखोराचे अन्य चार साथीदार पसार झाले असले, तरी पकडलेल्या दरोडेखोराकडून पोलिसांनी तपास करीत 12 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तो सराईत दरोडेखोर असून, त्याच्या अन्य साथीदारांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.
सुपे पोलिस सासवड चौकात रविवारी (दि. 11) रात्री गस्त घालत असताना त्यांना एक कार संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. पोलिसांनी त्यांना हटकले. कारमध्ये दरोड्यासाठी लागणारे साहित्य होते. कारमधून उतरलेल्या गणेश चंद्रभान गायकवाड (वय 23, रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारमधील अजित अरुण ठोसर, गोविंद शिरसाठ (रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड), सीमा रावसाहेब गायकवाड (रा. बसस्थानकामागे, जालना) व अजित ठोसर यांचा एक मित्र असे चौघे पसार झाले. या टोळीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी तपास करीत असताना या टोळीने सांगवी (ता. बारामती), मिरजगाव, बेलवडी (जि. नगर), फलटण आदी ठिकाणी चारचाकी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. गायकवाडकडे केलेल्या चौकशीतून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, एक पान्हा, मोबाईल, 4 पिकअप जीप, गॅस पाइपसह वाहने कट करण्याचे मशिन, असा एकूण 12 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेत असलेला गणेश गायकवाड याच्यावर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा साथीदार अजित ठोसर याच्याविरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे तीन, तर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा एक गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, जिनेश कोळी, अंमलदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अजय घुले, राहुल भाग्यवंत, रूपेश साळुंके, संदीप लोंढे, महादेव साळुंके, किसन ताडगे, निहाल वणवे आदी पोलिस कर्मचार्यांच्या पथकाने केली.