बारावीच्या परीक्षा pudhari
पुणे

12 th Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

नोंदणी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 8 हजारांनी घटल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा आज मंगळवारपासून (दि. 11) सुरू होत आहे. यंदा 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 8 हजारांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी परीक्षेबाबतची माहिती सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर या वेळी उपस्थित होत्या. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, 6 लाख 94 हजार 652 मुली, 37 तृतीयपंथी आहेत. यंदा विज्ञान शाखेतून 7 लाख 68 हजार 967, कला शाखेतून 3 लाख 80 हजार 410, वाणिज्य शाखेतून 3 लाख 19 हजार 439, व्यावसायिक अभ्यासक्रमातून 31 हजार 735, आयटीआयमधून 4 हजार 486 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यभरातील 3 हजार 373 मुख्य केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

गोसावी म्हणाले, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात 10.30 वाजता, तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित असले पाहिजे. गेल्या वर्षाप्रमाणेच परीक्षेच्या वेळेनंतर वाढीव दहा मिनिटे दिली जाणार आहेत. परीक्षेच्या कालावधीमध्ये ताणतणाव मार्गदर्शनासाठी समुपदेशक नियुक्ती, हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प परीक्षा देऊ न शकल्यास संबंधित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर 12, 15 आणि 17 मार्च रोजी परीक्षेची संधी दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षेत खंड ठेवण्यात आला आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेले आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरण्यात यावे. अन्य संकेतस्थळ किंवा यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT