राज्यातील शेतकर्‍यांसाठी 12 हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौरऊर्जेद्वारे केली जाणार आहे. Pudhari File Photo
पुणे

सौरऊर्जेतून मिळणार 12 हजार मेगावॅट वीज

पुढारी वृत्तसेवा
शिवाजी शिंदे

पुणे : पृथ्वीच्या तापमानवाढीला जबाबदार असणार्‍या आणि प्रदूषणकारी अशा कोळशावरच्या वीजनिर्मितीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शेतकर्‍यांसाठी 12 हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौरऊर्जेद्वारे केली जाणार आहे. या वीजनिर्मितीचे उद्दिष्ट एक ते दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे. सौरऊर्जेवरील वीज निर्मितीसाठी राज्यात 48 हजार एकर जमिनीची गरज भासणार आहे.

राज्यात सध्या दोन कोटी 30 लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. सध्या राज्यात उपलब्ध असलेली वीज 30 टक्के औद्योगिक, 30 टक्के शेतकरी आणि 40 टक्के घरगुती या प्रमाणात वापर होत आहे. मात्र यामध्ये शेतकर्‍यांना कायमच कमी प्रमाणात वीज उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्‍यांना दिवसाही वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना महावितरणने जाहीर केली आहे. एक ते दीड वर्षात (डिसेंबर 2025) पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकर्‍यांना दिवस वीज उपलब्ध होणार आहेच; शिवाय पुढची पाच वर्षे ही वीज मोफत देण्यात येणार आहे. अर्थात शेतकर्‍यांना प्रत्येक महिन्याला वीज बिल येणार आहे. मात्र, हे बिल शासन अदा करणार आहे. या योजनेसाठी राज्यात जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. साधारणपणे एक किलोवॅटसाठी 4 ते 5 एकर जमिनीची गरज आहे. त्यातही सध्या शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या गायरान जमिनीवर हे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. त्यानंतरही जागा अपुरी पडल्यास खासगी जमीन मालकांकडून घेण्यात येणार आहे. सौरऊर्जेतून निर्माण होणार्‍या विजेच्या माध्यमातून मिळणारी वीज ते महावितरणला विकणार, त्यामधून जमीन मालकांना रक्कम मिळणार आहे. अर्थात यासाठी काही उद्योजक पुढे येत आहेत. तेच यामध्ये गुंतवणूक करीत आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर सौरऊर्जा प्रकल्प वाढणार

पारंपरिक विजेबरोबर राज्य शासनाने घरगुती वीज ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमधून ग्राहकांना 3 मेगावॅटपर्यंत सबसिडी मिळणार आहे. भविष्यात या योजनेत 50 ते 60 टक्के घरगुती ग्राहक सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेमधून 100 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.

दोन हजार मेगावॅट वीज रोज उपलब्ध

राज्यात सध्या अपारंंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून दोन हजार मेगावॅट वीज रोज उपलब्ध होत आहे. ही वीज सौरऊर्जा, पवनऊर्जा, उसाची मळी याच्या माध्यमातून मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT