Daund Crime News  File Photo
पुणे

Daund Crime News: शेवटी न्याय मिळाला, दौंडमध्ये १२ जणांना जन्मठेप; पत्नीसमोरच केली होती पतीची हत्या

बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाचा एेतिहासिक निकाल ; शिक्षेत चार सख्ये भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

बारामती : दौंड येथील एका खून खटल्यामध्ये बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बाराजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये चार सख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे. बारामतीत जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून अधिक जणांना जन्मठेप सुनावण्याचा हा पहिलाच खटला आहे.

संजीत जयप्रकाश टाक, सुजीत जयप्रकाश टाक, रवी जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू दिपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, बबलू हिरामण सरवान, सुरेश हिरालाल सरवान, मयुरी संजीत टाक, माधुरी संजीत टाक, शोभा किशोर वाल्मिकी व विकी नरेश वाल्मिकी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

दौंड येथे ३ मे २०१८ रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी मीना नरवाल व त्यांचे पती विनोद नरवाल हे दोघे चतुर्थी असल्याने रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून गणपतीचे दर्शन घेवून येत असताना दौंड न्यायालयाजवळ पासलकर वस्ती येथे आरोपींनी त्यांना अडवले. तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठ्या, फरशीचे तुकडे, दगडांनी विनोद यांना बेदम मारहाण केली. मीना नरवाल यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आरडाअोरडा एेकून उषा वडमारे या तेथे आल्या, त्यांनाही मारहाण झाली. विनोद नरवाल यांना उपचारासाठी प्रथम दौंड व तेथून पुणे येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

मीना नरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. दौंडचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींविरुद्ध बारामतीच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते

न्यायाधिश एस. आर. पाटील यांच्यासमोर हा खटला चालला. त्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. त्यांनी दोषसिद्धीसाठी आठ साक्षीदार तपासले, फिर्यादी यांचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा, न्यायवैद्यक पुरावा व जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत १२ जणांना खून प्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने कैद, कलम ३४१ नुसार पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद, कलम ५०६ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, भादविं १४३ नुसार पाच हजार रुपये दंड, कलम १४८ नुसार १ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सर्व आरोपींनी दंडाची रक्कम ५ लाख ४ हजार रुपये न्यायालयात जमा केल्यास ही रक्कम फिर्यादी मीना नरवाल यांना नुकसान भरपाई पोटी द्यावी असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले.

या खटल्यात अॅड. जोशी यांना सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, अॅड. मंगेश देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, जी. के. कस्पटे, हवालदार मनिषा अहिवळे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT