पुणे

आंबा महोत्सवात 11 कोटींची उलाढाल; पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य कृषी पणन मंडळाच्या उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक विक्री योजनेंतर्गत सुरू केलेल्या आंबा महोत्सवात पुणेकर ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आतापर्यंत 70 स्टॉलवर 35 हजार आंबा पेट्यांची विक्री झाली आहे. त्यातून दोन महिन्यांत सुमारे 11 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस म्हणजे 31 मे पर्यंत आंबा विक्री सुरू राहील. मार्केट यार्डातील पीएमटी बस डेपोशेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत 1 एप्रिलपासून आंबा महोत्सव सुरू झाला आहे.

कोकणातील हापूस आंबा बागायतदार शेतकर्‍यांसह सोलापूर व सातारा जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील महिला बचत गटांची विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांचीही विक्री सुरू आहे. याबाबत पणन मंडळाचे देशांतर्गत व्यापार विकास विभागाचे सहायक सरव्यवस्थापक मंगेश कदम म्हणाले, आंबा महोत्सवात आतापर्यंत 1 लाख 70 हजार डझनाइतकी आंबा विक्री झाली आहे. गुणवत्तापूर्ण हापूस, केशर आंब्यांना दर्जानुसार प्रतिडझनास 400 ते 700 रुपये असा दर मिळाला असून, 11 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे.

पणनच्या आंबा महोत्सवात 2019 पासून सहभागी होत आहे. हापूस, केशर, पायरीची 4 हजार झाडे असून, यंदा 2100 पेट्या आंबा विक्री झाली. सुरुवातीस 5 डझन पेटीस 6 ते 7 हजार आणि सध्या दोन ते अडीच हजार रुपये दर मिळत आहे. कोकणातील आंबा बागायतदार शेतकर्‍यांना महोत्सवातून पुणेकर ग्राहकांना थेट आंबा विक्री करता येत असून, बाजार समितीऐवजी थेट विक्रीत आम्हाला तीन ते चारपट फायदा झाला.

                       – अमित शिरसेकर, आंबा बागायतदार शेतकरी, राजापूर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT