पुणे; पुढारी वृत्तसेवा : मोगर्याच्या सुवासिक फुलांसह संत्री, आंबा, मोसंबी, अननस, सफरचंदासारख्या 5 हजार 555 फळांचा महानैवेद्य प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात दाखविण्यात आला. तब्बल 100 किलो मोगर्याच्या सुवासिक फुलांनी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. तर, भारतीय वारकरी भजन मंडळाच्या भजन-कीर्तनाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिरतर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात वासंतिक चंदनउटी व मोगरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून, भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंती बांधणीचे आहे. त्यामुळे मंदिर गाभार्यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत मोगर्याची फुले आणि विविध फळांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून, वर्षभरात विविध उत्सव केले जातात. मोगरा महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.