पुणे

पुणे : ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासासाठी करणार 100 कोटींचा खर्च

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यात बांधकामासाठी 70 कोटी, तर फर्निचर आणि इतर सुविधांसाठी 30 ते 40 कोटींचा खर्च असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच, बीओटी तत्त्वावरही हा प्रकल्प उभारण्यासंबंधीची चाचपणी केली जाईल, असेही सांगितले.

महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यासाठी राज्यातील वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागविले. त्यात आलेल्या 8 प्रस्तावांपैकी एका प्रस्तावाची निवड 21 सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय पदाधिकार्‍यांच्या निवड समितीने केली. या प्रस्तावाचे सादरीकरण नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे केले. त्यावर पवार यांनी काही सूचना आणि बदल सुचविले असून, 15 दिवसांनी पुन्हा फेरसादरीकरण होणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. हा खर्च प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत करावा लागणार आहे. एकंदरीत, खर्चाचा आकडा लक्षात घेता हा प्रकल्प बीओटी अथवा पीपीपी तत्त्वावर विकसित करता येईल का? याचीही चाचपणी केली जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

गरज पडल्यास हस्तक्षेप करू : अमित देशमुख

'शहराचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. याबाबत गरज पडल्यास शासनस्तरावर हस्तक्षेप केला जाईल,' असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित देशमुख पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. देशमुख म्हणाले, 'बालगंधर्व रंगमंदिराबाबत पुणेकरांमध्ये श्रद्धेची भावना आहे. नाट्यगृह ज्या व्यवस्थेकडे हे नाट्यगृह आहे, त्या व्यवस्थेला हा प्रश्न विचारायला हवा. बालगंधर्व रंगमंदिराबाबत लोकभावना असेल तर त्यासंदर्भात चर्चा करता येऊ शकते. या रंगमंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला एक इतिहास आहे. त्याच्याशी पुणेकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. या लोकभावनेची नोंद घेतली पाहिजे. आम्ही कलाकारांशी चर्चा करायला तयार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्याबाबत चर्चा करू. रंगकर्मी आणि पुणेकरांच्या भावनेला धक्का लागणार नाही याचीही दक्षता घेऊ.'

आपचे आंदोलन

पुणेकर रसिक आणि कलाकारांना अंधारात ठेवून शहराचे सांस्कृतिक वैभव असणारे बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावावर पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाने सोमवारी आंदोलन केले.

पुण्याचा सांस्कृतिक ठेवा असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 2018 साली आणला. त्या वळी राष्ट्रवादीने विरोध केला होता. आता पालिकेची मुदत संपल्यावर प्रशासक, भाजप व राष्ट्रवादी यांची अभद्र युती झाल्याचा आरोप या वेळी आंदोलकांनी केला. रंगमंदिराचा तथाकथित पुनर्विकास नक्की कोणासाठी? ठेकेदारासाठी की रसिकांसाठी? असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. राज्य संघटक व शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT