जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (दि. 22) झालेल्या कांदा लिलावात प्रति दहा किलोस 511 रुपये भाव मिळाला. सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी ही माहिती दिली.
आळेफाटा उपबाजारात सध्या कांद्यास समाधानकारक भाव मिळत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विकला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी गावरान कांदा शिल्लक आहे ते कांदा विक्रीस आणीत आहेत.
पावसाळ्यात लागवडी झालेला लाल सेंद्रिय कांद्याच्या काढणीस आता सुरवात झाली आहे. हा कांदा आता काही प्रमाणात विक्रीस येत आहे. दीपावलीनंतर या कांद्याची आवक वाढण्याची चिन्हे आहेत. गावरान काद्यांची आवक घटणार आहे.
रविवारी झालेल्या लिलावात कांद्यास प्रतिदहा किलो पाचशे रुपये भाव मिळाला होता. त्यात अल्पशी वाढ झाली. आवक मात्र कमीच होत आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात 10 हजार 700 गोणी शेतकरी वर्गाने विक्रीस आणल्या होत्या. यामध्ये 254 गोणी नवीन कांद्याच्या असल्याचे सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
दहा किलोचा भाव (रुपयांत)
एक्स्ट्रा गोळा : 470 ते 511
सुपर गोळा : 450 ते 470
सुपर मीडियम : 425 ते 450
गोल्टी : 300 ते 390
बदला व चिंगळी : 200 ते 350.
नवीन लाल कांदा : 200 ते 421.