काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी (दि. 25) लागलेल्या आगीत 10 एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काठापूर परिसरात गेल्या एक महिन्यात शॉर्टसर्किटमुळे उसाचे नुकसान झाल्याची ही दुसरी घटना आहे.
काठापूर बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी पीयूष दीपक गांधी, गणपत हौजी कांबळे, दत्तात्रय कांबळे, कौसाबाई कुंडलीक करंडे, मधुकर कांबळे, भिवाजी कांबळे, शिवाजी कांबळे व इतर शेतकर्यांच्या शेतातील ऊस जळून गेला.
या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून, या सर्वच 10 ते 12 एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. काठापूर बुद्रुक या ठिकाणी महावितरणचे उपकेंद्र आहे. या ठिकाणावरून आजूबाजूच्या परिसरातील गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे काठापूर बुद्रुक गावात विजेच्या तारा पसरलेल्या आहेत.
अनेक ठिकाणी वीजतारांची उंची कमी आहे, तर काही ठिकाणी तारांना झोळ आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीच्या अनेक घटना घडत असतात. मागील महिनाभरापूर्वीही अशीच आग लागली होती. महिनाभरात पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याने 10 एकर क्षेत्रावरील ऊस जळाला. तोडणीला आलेला ऊस या घटनेत वाया जाणार आहे.
साखर कारखाने अजूनही एक ते दीड महिना सुरू होणार नाहीत. त्यामुळे ऊस कारखाना हा ऊस तोडून नेणार नाही. या घटनेत शेतकर्यांची आर्थिक हानी झाली असून, महावितरणच्या वतीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच अशोक करंडे व शेतकर्यांनी केली आहे.