पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोर्हाडेवाडी व चर्होलीनंतर आता डुडुळगाव येथे पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार आहे. तेथे एकूण 1 हजार 190 सदनिका बांधण्यात येणार असून, त्यासाठी 167 कोटी 83 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा दरापेक्षा हा खर्च 17.44 टक्के इतका अधिक आहे. हे काम गुजरात येथील शांती कन्स्ट्रक्शन प्रा. लि. करणार आहे.
पालिकेने मोठा गाजावाजा करीत पंतप्रधान आवास योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील नागरिकांना 9 हजार 458 सदनिका देणार असे घोषित केले होते. मात्र, दहापैकी केवळ चर्होली व बोर्हाडेवाडी येथील दोनच प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून, रावेत येथील काम सुरूच झालेले नाही. तर, अद्याप एकाही सदनिकचे वितरण करण्यात आलेले नाही.
आता, डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.16) स्थायी समितीची मंजुरी दिली आहे. या कामासाठी स्थापत्य विभागाने 142 कोटी 89 लाख 51 हजारांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला शांती कन्स्ट्रक्शन व यशनंद इंनिनिअर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन अशा दोन ठेकेदार कंपन्यांच्या निविदा दरापेक्षा अधिक दर प्राप्त झाला आहे. शांती कन्स्ट्रक्शनने 173 कोटी 58 लाख 53 हजाराचा दर दिला. तर, यशनंद इंजिनिअर्सने 176 कोटीचा दर दिला. त्यानंतर शांती कन्स्ट्रक्शनने 167 कोटी 50 लाख 98 हजारांचा सुधारित दर दिला. हा दर निविदा रक्कमेपेक्षा 17.44 टक्के अधिक आहे. एसएसआरच्या सन 2022-23 च्या नव्या दरसूचीनुसार हा दर केवळ 3.43 टक्के अधिक असल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. त्यानुसार शांती कन्स्ट्रक्शनला काम देण्यास व 167 कोटी 83 लाख खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
गृहप्रकल्पाची मुदत अडीच वर्षे :
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी डुडुळगाव येथील 2 एकर जागेत हा गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. तेथे 15 मजली 5 इमारती बांधण्यात येणार आहेत. एकूण 1 हजार 190 सदनिका असतील. सदनिकेचा आकार 323 चौरस फूट इतके आहे. बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी अडीच
वर्षांचा आहे.
नव्या दरसूचीनुसार केवळ 3.43 टक्के दर
या कामाची मूळ निविदा 142 कोटी 89 लाख 51 हजार खर्चाची आहे. शांती कन्स्ट्रक्शनने 173 कोटी 58 लाखांचा दर कमी करून तो 167 कोटी 50 लाख 98 हजार इतका केला. एसएसआरच्या सन 2022-23 च्या नव्या दरसूचीनुसार हा दर केवळ 3.43 टक्के अधिक आहे. त्यामुळे शांती कन्स्ट्रक्शनला काम देण्यात आले आहे, असे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.