पुणे: पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीविना निवडीअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यातील तब्बल 1,114 उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात मराठी माध्यमासाठी 963, उर्दू माध्यमासाठी 100, हिंदी माध्यमासाठी 35, बंगाली माध्यमा साठीच्या 16 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना आता दिलासा मिळाला आहे. (Latest Pune News)
दुसर्या टप्प्यातील मुलाखतीविना निवडीचा पर्याय निवडलेल्या 18 जिल्हा परिषदांनी 468, 13 महापालिकांनी 362, 57 नगरपालिका- नगर परिषदांनी 221, तर 25 खासगी शैक्षणिक संस्थांनी 537 अशा एकूण 1 हजार 588 रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली होती. त्यानुसार पात्रताधारक उमेदवारांचे निवड यादीकडे लक्ष लागले होते.
त्यानुसार मुलाखतीविना निवडीअंतर्गत 1 हजार 588 रिक्त पदांसाठी एकूण 1 हजार 114 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात पहिली ते चौथीसाठी 554, सहावी ते आठवीसाठी 210, नववी ते दहावीसाठी 216, अकरावी ते बारावीसाठी 134 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.