पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात भूमिअभिलेख विभागाने तीन वर्षांपूर्वी कात टाकली असून, नागरिकांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा अमलात आणली आहे. त्याद्वारे सोमवारी एका दिवसात तब्बल एक लाख 64 हजार 742 डिजिटल सेवांचा घरबसल्या लाभ घेतल्याने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाला 31 लाखांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. सोमवारी राज्यभरातून तब्बल एक लाख 17 हजार 629 सातबारा उतारे, 35 हजार 489 आठ अ, दोन हजार 462 फेरफार उतारे, तर पाच हजार 892 प्रॉपर्टी कार्ड आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी डाऊनलोड करण्यात आले आहेत.
त्यातून 31 लाख 29 हजार 120 रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. ऑनलाइन डिजिटल सातबारा, आठ अ किंवा फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी विभागाकडून केवळ 15 रुपये शुल्क आकारले जाते, तर प्रॉपर्टी कार्डसाठी 135 रुपये शुल्क आकारले जात आहे. याचा शेतकर्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
या सेवा उपलब्ध
डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ अ, फेरफार उतारे, प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, पीकविमा, बियाणे खरेदी, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादी.