पुणे; पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात महापालिकेला आतापर्यंत 1 हजार 520 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, हे उत्पन्न गतवर्षीपेक्षा 225 कोटी जास्त असल्याची माहिती करसंकलन आणि करआकारणी विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.
मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी 2022-23 च्या अंदाजपत्रकात मिळकतकर विभागाचे उत्पन्न 2 हजार 400 कोटी जमा गृहीत धरले आहे. मात्र, यावर्षी महापालिकेची अभय योजना नसल्याने तसेच निवडणुका तसेच इतर कामांमुळे महापालिकेच्या करसंकलन विभागास अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर 1 हजार 505 कोटी शहरातून, तर समाविष्ट 23 गावांतून 15 कोटी उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. पुढील तीन महिन्यांत या विभागास तब्बल 900 कोटींची वसुली करावी लागणार आहे. मागील वर्षी याच कालावधीत महापालिकेला 23 गावे आणि शहरातून 1 हजार 295 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यामध्ये 1278 कोटी शहरातून मिळाले होते.
सुटीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्र सुरू
महापालिकेकडून मिळकतकराची बिले आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात (एप्रिल) पाठविली जातात. तर या बिलांची दोन सहामाहीत विभागनी केली जाते. त्यात पहिली सहामाही 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत असते. तर या कालावधीत नागरिकांना 31 मे पर्यंत कर भरल्यास महापालिका मिळकतकराच्या सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत देते. तर 30 जूनपर्यंत कर न भरल्यास प्रत्येक महिन्यात दोन टक्के दंड आकारणी सुरू करण्यात येते.
तर दुसरी सहामाही 1 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंत असते. या कालावधीत नागरिकांनी 31 डिसेंबरपर्यंत कर न भरल्यास थकबाकीवर दोन टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे वर्षाअखेरीस हा थकबाकीचा दंड 24 ते 25 टक्के होतो. त्यामुळे नागरिकांवर दोन टक्के दंडाचा बोजा पडू नये, यासाठी महापालिकेकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी करभरणा केंद्र सुरूच ठेवली जाणार आहेत तसेच 31 मार्च 2023 पर्यंत सुटीच्या दिवशीदेखील सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू असणार आहेत.