पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, कार्यारंभ तसेच लोकार्पण करतील. 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रात मोदी प्रथम नागपूरला जातील आणि सकाळी 9 वाजता स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील, त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) निवेदनात म्हटले आहे. (PM Modi Maharashtra visit)
गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिपदा कार्यक्रमानिमित्त मोदी स्मृती मंदिर येथे जाऊन RSS संस्थापकांना अभिवादन करतील. ते दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करतील. याच ठिकाणी 1956 मध्ये डॉ. आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
त्यानंतर पंतप्रधान माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, 14 ओपीडी आणि 14 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतील.
ते नागपूरच्या सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा उत्पादन केंद्रालाही भेट देतील. येथे ते 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद धावपट्टीचे उद्घाटन करतील, जी मानवविरहित हवाई वाहनांसाठी (UAVs) तयार केली आहे. तसेच, ते लोइटरिंग म्युनिशन आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी नव्याने उभारलेल्या सुविधेचे उद्घाटन करतील.
त्यानंतर मोदी छत्तीसगडला जाणार असून तिथे 33700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. छत्तीसगडमध्ये 29 जिल्ह्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या 130 PM SHRI शाळांचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांना नवीन घरे मिळतील. काही लाभार्थ्यांना मोदी प्रत्यक्षपणे घरांच्या चाव्या सुपूर्द करतील.
दरम्यान, 3 ते 6 एप्रिलदरम्यान मोदी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 'महासागर पॉलिसी'बाबत ते या दौऱ्यात चर्चा करणार आहेत. बँकॉकमध्ये 3 ते 4 एप्रिलदरम्यान, सहाव्या BIMSTEC समिटमध्ये मोदी सहभागी होणार आहेत. 3 एप्रिलला थायलंडला भेट देतील. तिथे मोदी थायलंडच्या पंतप्रधानांची चर्चा करतील.
तर 4 ते 6 एप्रिल दरम्यान ते श्रीलंकेला भेट देतील. श्रीलंकेत ते अध्यक्ष अनुरा कुमारा डिसनायका यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. याशिवाय कोलंबोतील इतरही वरिष्ठ नेत्यांना मोदी भेटणार आहेत. अनुराधापुरा येथे काही प्रकल्पांचे उद्घाटन मोदी करणार आहेत.