पालघर : वरई सफाळे रस्त्यावर पारगावच्या हद्दीत दुचाकी ट्रॅक्टर अपघातात वाढदिवसाच्या दिवशीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकी ट्रॅक्टरला धडकल्याने अपघात झाला होता.
अपघातात वाढदिवसाच्या दिवशी दुचाकीस्वार वैभव संतोष वरठा (वय २१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तो पारगावच्या दांडेकर पाड्याचा रहिवाशी होता. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पारगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून वैभव वरठा पारगावच्या दिशेने जात होता.
वरई पारगाव रस्त्यावर पारगावच्या हद्दीत मुंबई-बडोदरा दृतगती महामार्गाच्या पुलाखाली त्याच्या दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिली. अपघातात वैभवचा जागीच मृत्यू झाला. रविवारी वैभवचा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशीच वैभवचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अपघातात संजय दांडेकर (वय २०) राहणार गिराळे डोंगर पाडा हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.