राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडीचा पर्यटनावर परिणाम Pudhari Photo
पालघर

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडीचा पर्यटनावर परिणाम

नाताळ, नववर्ष स्वागत रिसॉर्ट बुकिंगमध्ये २० टक्क्यांनी घट

पुढारी वृत्तसेवा

पालघर : व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम पालघर जिल्ह्यातील पर्यटनावर होत आहे. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारे, प्रसिद्ध मंदिरे आणि हिरवाईने नटलेला निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर मध्ये येत असतात.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बुकिंगला सुरुवात होते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडधात पर्यटकांचे आगमन होण्यास सुरुवात होते परंतु हॉटेल आणि रिसॉर्ट मधील बुकिंगमध्ये यंदा वीस टक्क्यांनी घट झाली आहे. नाताळ दरम्यान बुकिंग फुल होत असलेले हॉटेल यंदा बुकिंगच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांना संपर्क साधला असता वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्यटना निमित्ताने पालघरमध्ये येण्यास पर्यटकांकडून नकार दिला जात आहे.

व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे महामार्गाची झालेली दुरावस्था आणि वाहतूक कोंडी पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक ठरत आहे. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर जिल्ह्यात येत असतात, याच महत्वाच्या वेळेची प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करीत असतात. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि दुरावस्थेमुळे बुकिंगमध्ये वीस टक्क्‌यांनी घट झाल्याची माहिती हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक आशिष पाटील यांनी दिली. सद्यस्थितीत बुकिंग सुरु आहे, परंतु पर्यटन व्यवसाय पूर्व पदाबर येण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील व्हाईट टॉपिंगचे काम लवकर पूर्ण करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याची गरज हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवा बीच प्रसिद्ध आहे. केळवे येथील समुद्र किनारा आणि शीतला देवी मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील शिरगांव, डहाणू आणि बोर्डी येथील बीच प्रसिद्ध आहेत. शांत वातावरणात घोलवडच्या प्रसिद्ध चिकू फळाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक बोडर्डी बीच आणि घोलबडला जात असतात. पालघर जिल्ह्यातील केळवा, डहाणू, बोर्डी आणि अर्नाळा बीच परिसरात हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायाने जोम धरला आहे.

नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी सुमारे पन्नास हजार पर्यटक येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि गुजरात राज्यातून पर्यटक येत असतात. महामार्गावर गुजरात राज्याचा सीमा भाग असलेल्या आच्छाड पासून घोडबंदर पर्यंतच्या १२१ किमी लांबीच्या रस्ताचे काँक्रीटीकरण केले जात आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून ६२० कोटी रुपये खर्च करून महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अच्छाड ते घोडबंदर पर्यंतच्या १२१ किलोमीटर लांबीपैकी ८८ टक्के व्हाईट टॉपिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- सुमित कुमार, प्रकल्प व्यवहभापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT