पालघर; पुढारी वृत्तसेवा : पालघर शहरातील अनेक सोसायट्या नैसर्गिक नाल्यांवर बांधल्या गेल्याचा आरोप होत आहे. मात्र, या सोसायट्या कशा वसविल्या गेल्या याबाबत सदनिका विकत घेणाऱ्याच्या लक्षात येत नाही. पुराचे पाणी घरात शिरल्यानंतरच याची जाणीव होत आहे. तत्पूर्वी विकसकाला सर्व रक्कम अदा केली गेल्याने डोक्याला हात लावून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. नैसर्गिक नाले बुजवून त्या नाल्यांवर मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत. गेली अनेक वर्षे तोच मुद्दा वारंवार समोर येत आहे. या बेकायदेशीर कामे करणाऱ्या विकसकांना अभय कुणाचे, असा प्रश्न गेली अनेक वर्षे विचारला जात आहे.
या बेकायदेशीर अनेक सोसायट्यांचे सांडपाणी सुद्धा राजरोसपणे वाहत्या नाल्यात सोडले जाते. इमारतीला परवानगी देताना सांडपाणी प्रक्रियेच्या मूल्यमापनाचे कशा पद्धतीने अवमूल्यन केले जाते याचा वस्तुपाठच या निमित्ताने अधोरेखित होत आहे. देखरेख करणारी यंत्रणा सुद्धा कोण काम करते, याबाबतची उत्तरे सध्या पालघरवासीयांना आजही सापडली नाहीत.
नाल्यावरील बांधकामे करून काही ठिकाणी हे नाले वळविले आहेत. काही नैसर्गिक नाल्याचे अस्तित्व सुद्धा ठेवले नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हानी होतच राहते. काही ठिकाणी नाले अस्तित्वात असल्याचाही गैरफायदा घेण्यात येत आहे. शहरातील अनेक सदनिकांमधून राजरोसपणे सांडपाणी वाहत्या नाल्यात सोडले जाते. सकाळी ६ ते दुपारी ११ या वेळेत हे पाणी वाहून जाते. हे पाणी कोणत्या सदनिकेमधून बाहेर येते त्याचा शोध संबंधित यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. हे सांडपाणी आजूबाजूच्या गावांमध्ये जात असून त्याचा परिणाम त्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. तोच भाजीपाला आपण सर्वजण अगदी प्रेमाने खात असतो. भविष्यात या पाण्याचा परिणाम मनुष्य प्राण्याबरोबर पशुपक्ष्यानाही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. संबंधित यंत्रणेने परवानग्या देताना त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय दिल्या होत्या का, असा सवालही उपस्थित होत आहे. सध्या पालघर जिल्ह्याचे ठिकाण असून वस्तीही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
अनेक परप्रांतीय लोक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यांनीही सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या खरेदी करताना विकासकाने कोणत्या प्रकारच्या परवानग्या घेतल्या याचे ज्ञान नसल्याने ते काही वर्षानंतर पस्तावत आहेत. काही विकसकांनी लागणाऱ्या परवानग्या नियमानुसार अदा केल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे असल्याची चर्चा मात्र सध्या सुरू आहे.
पालघरमध्ये आता लोकांनी पाण्यात राहायची सवयी करुन घेतली पाहिजे. विकसक कुणालाच जुमानत नाही. गेल्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी जीसीबीने पाणी जाण्यासाठी नाल्याची खोली वाढवून पाणी काढले. आता त्या ठिकाणी माती- मुरूम भरणी करुन नाले बुजवले. इमारती बांधून पूर्ण केल्या. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शहर जलमय होणार आहे. विकसकांची मनमानी चालूच आहे. देवीशा रोडवरील पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
– अरुण माने. स्वीकृत नगरसेवक, पालघर नगर परिषद