पालघर : रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी उपेक्षित राहिले आहेत. फ्लाईंग राणी पाठोपाठ वलसाड फास्ट पॅसेंजर चेही डबल डेकर डबे काढण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रवासहाल संपता संपत नाही. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकरचे प्रवासी डबे मुदत बाह्य झाल्याचे कारण देत त्या जागी सिंगल डेकर डबे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र दुसऱ्याच दिवशी पॅसेंजरला लावलेले सिंगल डेकर डबे दुरावस्थेत व गंजलेल्या स्थितीत दिसून आले. त्यामुळे हा काय प्रकार आहे असा सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित झाला. वलसाड व फ्लाईंग राणि एक्सप्रेस या दोन गाड्या सकाळी मुंबईकडे कामावर जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण गाड्या मानल्या जात होत्या. या दोन्ही गाड्यांमध्ये डबल डेकर डबे असल्याने पूर्वी मोठी प्रवासी क्षमता होती. मात्र आता सिंगल डेकर डब्यांमुळे प्रवाशांना दाटीवाटीने उभ्याने प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे येथील प्रवासी वर्गासोबत रेल्वे प्रशासन एक प्रकारचा अन्याय करत असल्याचे आरोप केले जात आहेत.
पालघरचा पट्टा उपनगरीय रेल्वे घोषित करून अनेक वर्ष उलटली. या उपनगरीय रेल्वेच्या नावाखाली येथील रेल्वे प्रवाशांकडून कर गोळा केला जातो. तसेच महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानके रेल्वेला चांगला महसूल गोळा करून देतात. त्यानंतरही येथील प्रवाशांना हव्या तशा सुविधा दिल्या जात नाही. डहाणू लोकल सुरू होऊन दहा वर्ष उलटल्यानंतरही रेल्वे सेवेचा विस्तार हवा तसा करण्यात आलेला नाही. आजही एक तासाच्या अंतरात रेल्वे सेवा आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन येथील भागाला अन्यायाची वागणूक देत असल्याचे आरोप प्रवासी वर्ग करत आहेत.
पालघर जिल्हा स्थापन झाल्यानंतर येथे विविध सरकारी कार्यालय आली. त्यामुळे रेल्वेने पालघरला येणारी कर्मचारी प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अलीकडच्या काळात पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वे प्रवासी वर्गाची संख्या वाढत चालली आहे. रेल्वे प्रवासी वर्गाच्या तुलनेत रेल्वे सेवा तुटपुंज्या आहेत. कामाच्या वेळेवर प्रवाशांना खूपच दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. रेल्वे सेवांच्या दरवाजावर अनेक रेल्वे प्रवासी आजही आपला जीव टांगणीला लावलेले दिसून येतात. अशा स्थितीत रेल्वे प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.
वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकर डबे रविवारपासून बदलण्यात आले. गाडीच्या मागील भागात असणाऱ्या सात सर्वसाधारण सिंगल डेकर डब्यांमध्ये पालघरनंतर तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र होते. नव्याने जोडण्यात आलेले डबे अस्वच्छ असल्याचे व त्यामध्ये ढेकूण असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या. तर या सिंगल डेकर डब्यांमधील शौचालय अस्वच्छ असल्याचे तसेच त्यामध्ये पाणी नसल्याचे प्रवाशांकडून माहिती मिळाली. प्रवासादरम्यान जवळपास सर्व डब्यांमध्ये गर्दी व गोंधळाचे वातावरण असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.