सफाळे; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते डहाणू या रेल्वे स्थानकादरम्यान महत्त्वाचे स्थानक असलेल्या सफाळे रेल्वे स्थानकातील फाटकातील प्रवास प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. एखादी लोकल निघून गेल्यानंतर फाटक उघडताच हा
प्रवास म्हणजे मृत्यूचा सापळा बनत असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे.
गेले कित्येक वर्षांपासून सकाळी बाजारपेठेला पूर्व आणि पश्चिम मेला जोडण्यासाठी योग्य उड्डाणपूल नसल्याने येथील हजारो प्रवाशांच्या हाल होत आहेत. तसेच त्यांच्या जीविताला धोका सुद्धा निर्माण झाला आहे. नूतन मार्गाचे सुरू असलेले काम, कंत्राटदराचे शून्य नियोजन, वाढती रहदारी, उड्डाणपूलाचा अभाव, भुयारी मार्गांची आवश्यकता यामुळे सद्यस्थितीत प्रवाशांना मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनामार्फत वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न होत असला तरी हे प्रयत्न तोकडे पडत असून फाटक बंद असताना एक ते
दीड किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा लागतात. अनेकदा ट्रेन येत असताना देखील रहदारीमुळे फाटक उघडेच राहते.
अशा वेळी मोठा अपघात होऊ शकतो. पूर्व व पश्चिमेला जोडण्यासाठी लवकरात लवकर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी गेले कित्येक वर्षांपासून प्रवासी आणि त्यांच्या विविध संघटना करत आहेत. तसेच सफाळे पूर्वेला असलेला एफओबी चढण्या उतरण्यासाठी त्रासदायक व वेळखाऊ असल्याने येथून प्रवास करण्यास प्रवासी टाळतात. त्यामुळे हे प्रवासीदेखील फाटक ओलांडून ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव करतात. त्यामुळे या एफओबीला पर्यायी जिना काढण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.