मनोर; पुढारी वृत्तसेवा : पालघर शहरात दुचाकीस्वारांच्या अपघातांची संख्या रोखून हेल्मेटचा वापर वाढवण्यासाठी पालघर वाहतूक शाखेकडून अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून दंडात्मक कारवाई ऐवजी नवीन हेल्मेट खरेदीच्या शिक्षेतून जनजागृती केली जात आहे.
पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई न करता तात्काळ नवीन हेल्मेट विकत घ्यायला लावून वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी रोख रकमेचा दंड भरण्यासाठी वाहनचालक तयार होत नाहीत. दंड भरल्यानंतर वाहतूक नियमांच्या पालनाबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे पालघर शहरातील वाहतूक शाखेने वाहतूक नियमांच्या पालन व्हावे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
पालघर शहरात विनाहेल्मेट आणि अतिवेगामुळे दुचाकीच्या अपघातात वाढ झाली आहे. अपघाता दरम्यान हेल्मेट घातलेले असल्यास दुचाकीस्वाराचा जीव वाचण्याची शक्यता असल्याने दंडा ऐवजी सवलतीच्या दरात हेल्मेट वाटपाच्या मोहिमेची सुरुवात पालघर शहरातून करण्यात आल्याची माहिती वाहतुक पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमामुळे चालकांना वाहतूक नियम व शिस्तीचे धडे मिळाले आहेत.