पालघर

पालघर : पुलाअभावी रुग्णाचा जीवनमरणाशी खेळ

दिनेश चोरगे

वाडा; पुढारी वृत्तसेवा :  वाडा तालुक्यातील अखेरचे टोक असलेल्या आखाडा ग्रामपंचायत मधील भगतपाडा गावातील एका व्यक्तीला शेतीचे काम करत असताना सर्पदंश झाला. नदीपलीकडे असलेल्या या गावातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नदी पोहून येणे हाच असल्याने जीवनमरणाचा प्रवास करून या रुग्णाला दवाखान्यात दाखल केल्याने सुदैवाने त्याला जीवनदान मिळाले असून भगतपाडा गावाचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कैलास बामणे हे मूळचे खर्डी (मलाचाआंबा) येथील रहिवासी असून भगतपाडा गावात त्यांची सासुरवाडी आहे. येथे शेतीचे काम करत असताना 4 सप्टेंबरला त्यांना सर्पदंश झाला असून अत्यवस्थ झालेल्या कैलास यांना तातडीने उपचाराची गरज निर्माण झाली. कैलास यांना एका व्यक्तीने खांद्यावर घेऊन वाहती नदी पार करण्याचे धाडस दाखविले. त्यांना परळी आरोग्य केंद्र व पुढे वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोचविले. फुरसे जातीच्या सापाचे विष काहीसे हळू अंगात भिनत असल्याने कैलास यांचा जीव बचावला आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

भगतपाडा गावात जाण्यासाठी कोणताही बंधारा किंवा पूल नसल्याने लोकांच्या असुविधांबाबत वेगळे सांगायची गरज नसून लोकप्रतिनिधी
मात्र गाढ झोपेत असल्याने गरीबांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येणार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला जात आहे. भगतपाडा गावात पावसाळ्याच्या चार महिनेआड असलेली नदी पोहून प्रवास करावा लागत असून अनेकदा हागाव नॉट रिचेबल असतो.

SCROLL FOR NEXT