पालघर

पालघर : अंत्यसंस्कारासाठी नदीप्रवाहातून जीवघेणा प्रवास

दिनेश चोरगे

तलासरी; सुरेश वळवी :  पालघर जिल्ह्यात मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात काही लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही तसेच अन्य कोणताही मार्ग नसल्याने त्यांनी
नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरुन, ही नदी ओलांडली. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबीयांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. या भयंकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
झाला आहे.

तलासरी तालुक्यातील कोचाई- बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणार्‍या बोरमाळ गावातील भेंडीपाडा, पारसपाडा
या गावपाड्यात सुमारे सहाशे ते साडेसहाशे लोकवस्ती असलेल्या दोन्ही पाड्यांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. पुलाअभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन मार्ग काढत नातेवाईकांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासन
डोळ्यावर झापडे लावून बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बोरमाळ भेंडीपाडा या भागातील मागू
भाना धोडी नावाच्या वयोवृद्धाचा मृत्यू 20 ऑगस्ट रोजी झाला. त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना
उपलाट बोरमाळ आणि उपलाट यांच्यामधील ही नदी पार करावी लागली. व्हायरल व्हिडीओमध्ये कुटुंबातील सदस्य
आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे.
अशा परिस्थितीमध्येही मृतदेह घेऊन जात आहेत. स्मशानभूमी ही नदीच्या दुसर्‍या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली आहे. शिवाय अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य 20 किलोमीटर फेरा मारून न्यावे लागत आहे. बोरमाळ हे गाव गुजरात राज्याच्या सीमेला
लागून आहे.

प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष…

विशेष म्हणजे बोरमाळ भेंडीपाडा येथील नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार आहे. तर नदीच्या दुसर्‍या बाजूला उपलाट जाबीपाडा ते नदीपर्यंत डांबरी रस्ता आहे. सदर नदीच्या दोन्ही बाजुला सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी डांबरी रस्ता झाला. मात्र नदी पत्रावर पूल बांधला नाही. बोरमाळ याबाबत वारंवार पाठपुरावाही केला, मात्र
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मागू धोडी यांचे 20 ऑगस्टला निधन झाले. स्मशानभूमी नदी पलीकडे असल्याने आम्हा कुटूंबियांना पलिकडे जाण्यासाठी जीव धोक्यात
घालून नदी प्रवाहातून मृतदेह घेऊन जाऊन उघड्यावर अंत्यविधी करावे लागते.
मनोज धोडी,
कुटुंब सदस्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT