डहाणूत धोकादायक दगडी भिंतीला लाकडी टेकूचा आधार pudhari photo
पालघर

Dahanu wall collapse risk : डहाणूत धोकादायक दगडी भिंतीला लाकडी टेकूचा आधार

लाकडी टेकू लावून तात्पुरती व्यवस्था; नागरिकांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : डहाणू शहरातील मसोली परिसरात सेंट मेरी हायस्कूल जवळ चर्चच्या कुंपणाची जुनी व जीर्ण भिंत सध्या कोसळण्याच्या स्थितीत आहे. पावसामुळे भिंतीची अवस्था अधिकच खराब झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याने दररोज विद्यार्थी, पालक, नागरिक आणि वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

ही भिंत मसोली येथील एच पी गॅस एजन्सीकडे जाणार्‍या रस्त्यालगत असून जुनी आणि कमकुवत झालेली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांची, शालेय रिक्षा, व्हॅन, दुचाकी आणि इतर वाहनांची प्रचंड गर्दी होते. या वेळेस जर भिंत कोसळली, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या या धोकादायक भिंतीला तात्पुरते लाकडी टेकू लावण्यात आले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीची स्थिती कमकुवत झाल्याचे पाहायला मिळते. नागरिकांच्या मते, भिंत केवळ एका जोरदार पावसाच्या सरीत किंवा थोड्याशा धक्क्यानेही कोसळू शकते. धोकादायक परिस्थितीकडे अद्याप प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही.

सदर ठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावलेला नाही. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे बॅरिकेड्सही उभारले गेलेले नाहीत. त्यामुळे अनवधानाने एखादा अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यामध्ये धोकादायक भिंत पाडून सुरक्षित बांधकाम करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे किंवा वाहतुकीसाठी अडथळे निर्माण करून सुरक्षितता वाढवणे यांचा समावेश आहे. तसेच, ही भिंत जर खाजगी मालकीची असेल, तर मालकानेही याची जबाबदारी घेत योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

सदर धोकादायक स्थितीत असलेली भिंत ही सार्वजनिक रस्त्याच्या मार्जिनमध्ये येते. या भिंतीच्या धोकादायक स्थितीची नोंद घेऊन संबंधितांना पूर्वसूचना देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर भिंत तात्काळ निष्कासित करण्यात येणार आहे.
अक्षय गुडधे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT