सफाळे ः पश्चिम रेल्वेवरील 15 डब्यांची डहाणू लोकल धावण्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सफाळे, उमरोळी आणि डहाणू स्थानकांवरील प्लॅटफॉर्म लांबी वाढविण्याची कामे जलद गतीने सुरू असून, लवकरच या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांची पहिली लोकल नोव्हेंबर 2009 मध्ये विरार-दादर दरम्यान सुरू झाली होती. जानेवारी 2011 पासून ती विरार-चर्चगेट मार्गावर नियमित धावू लागली. मात्र, विरारनंतरच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म लांबी कमी असल्याने, ही लोकल विरारपर्यंतच मर्यादित राहिली होती.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर डहाणू मार्गावर 15 डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक पायाभूत कामांना गती मिळाली आहे. सफाळे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तार पूर्ण झाला असून उमरोळी येथे काम सुरू आहे. लवकरच डहाणू स्थानकातही हे काम सुरू होणार आहे.
डहाणू स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 हे 15 डब्यांच्या लोकलसाठी सक्षम असल्याने प्रारंभीच्या टप्प्यात त्यांचा वापर होऊ शकतो. गेल्या वर्षी 13 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई-डहाणू मार्गावर 15 डब्यांच्या लोकलची चाचणी घेण्यात आली होती.
प्रवाशांच्या दृष्टीने ही लोकल सुरू झाल्यास विरार ते डहाणू दरम्यानच्या गर्दीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रवासी व स्थानिक मंडळींकडून रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर 15 डब्यांची डहाणू लोकल नियमित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.