पालघर ः दिल्ली हाटच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, हस्तकला,प्रथा आणि परंपरांचे संवर्धनासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या नांदगावच्या हद्दीत 57 कोटी रुपये खर्चून आकार घेत असलेल्या वारली हाट कलादालन प्रकल्पाची राखडपट्टी सुरूच आहे. 2022 च्या डिसेंबर महिन्यात दोन वर्षांच्या मुदतवाढ कालावधी संपल्या नंतरही वारंवार मुदत वाढ दिली जात आहे.प्रकल्प अवस्थेत अपूर्ण आहे.
येत्या मार्च महिन्यात उर्वरित बांधकाम,विद्युतीकरण, पथदिवे, सजावट आणि पाणीपुरवठा आदी कामे पूर्ण केल्यानंतर वारली हाट प्रकल्प आदिवासी विकास विभागाकडे सोपवला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.80 टक्के काम पूर्ण झाले आहे, उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प अपूर्ण असल्याची माहिती समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली,कोकणा कोळी,ठाकूर आणि कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत.त्यापैकी वारली जमात लोकसंख्येने सर्वात मोठी जमात आहे.वारली चित्रकला ही वारली जमातीच्या आदिवासी बांधवांकडून जगाला मिळालेली एक मोठी देणगी आहे.वारली समाजाच्या विविध सांस्कृतिक प्रथा परंपरांचे संगोपन आणि संवर्धन होण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्तरावर वारली संस्कृतीचे कलादालन निर्माण करण्याच्या दृष्टीने वारली हाट प्रकल्प उभारण्यात येत आहे.
आदिवासींच्या दैनंदिन जीवनाशी निगडित वस्तूंचे संग्रहालय,हस्तकलेच्या वस्तूंचे उत्पादन प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी कलादालन निर्माण केले जात आहे. पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील महामार्गालगतच्या नांदगाव तर्फे मनोर गावच्या हद्दीत पाच एकर जागेत वारली हाट प्रकल्प आकार घेत आहे.आदिवासी विकास विभागाकडून देशाची राजधानी दिल्लीतील दिल्ली हाट प्रकल्पाच्या धर्तीवर पालघर तालुक्यात आदिवासी संस्कृती आणि कौशल्ये आणि हस्तकलांना वाव देण्यासाठी वारली हाट कलादालन प्रकल्पाची उभारणी केली जात आहे.
केंद्र सरकार आणि राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून आवारली हाटच्या बांधकामासाठी 57 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.वारली हाट कलादालन प्रकल्पात 66 व्यावसायिक गाळे,सात प्रदर्शन सभागृह,एक कॉन्फरन्स हॉल,दोन कार्यशाळा,आठ डायनिंग हट,दोन एटीएम मशीन,एक अँपी थिएटर आणि एक ओपन स्टेज तर दोन वाचनालय आणि दोन प्रतीक्षा कक्ष असणार आहे.अँपी थिएटर लगत चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय,वरचे दोन मजले हॉटेल आणि चौथ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.
1 जून 2016 रोजी वारली हाट प्रकल्पाच्या 57.85 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी नंतर अडीच वर्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून 20 नोव्हेंबर 2018 रोजी 37.05 कोटी रुपयांच्या रकमेस तांत्रिक मान्यता देण्यात आली.एक कंपनीला 08 मार्च 2019 रोजी वारली हाटच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते.दोन वर्षात बांधकाम पूर्ण केले जाणार होते, परंतु कोरोनामुळे वारली हाटच्या कामाला 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.त्यानंतर मुदतवाढ दिली जात आहे.
निधी उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित बांधकाम, विद्युतीकरण, पथदिवे, अंतर्गत सजावट पाणीपुरवठा आणि परिसर सुशोभीकरणाची कामे पूर्ण केली जातील.त्यानंतर वारली हाट प्रकल्प आदिवासी विकास विभागाकडे सोपवला जाणार आहे.महेंद्र किणी , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता