कासा: वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन झालेल्या डहाणूतील एका आदिवासी शेतकऱ्याची तब्बल 50 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबदल्याची रक्कम लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवत दलालांनी बँक खात्याशी छेडछाड करून ही रक्कम परस्पर वळती केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादी किरण पालवा यांच्या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी सुरज गिंभल, धर्मा वळवी आणि प्रसाद उर्फ मॉन्टी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाढवण बंदर प्रकल्पासाठी तवा येथील गट क्रमांक 173 मधील सुमारे 2.30 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. संबंधित जमिनीच्या मोबदल्यापोटी शासनाकडून 2 कोटी 93 लाखांहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली होती.
ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र, कासा शाखेतील खात्यात जमा होणार होती. आरोपींनी फिर्यादींच्या निरक्षरतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेत शासनाकडून मिळणारा मोबदला लवकर मिळवून देतो, असे सांगून त्यांना विश्वासात घेतले.
एप्रिल महिन्यात फिर्यादींना बोईसर येथील एका खासगी बँकेत नेण्यात आले. तेथे विविध कागदपत्रांवर सह्या व अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. तसेच त्यांच्या बँक खात्याशी संबंधित मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी बदलून आरोपींनी स्वतःचे संपर्क जोडल्याचा आरोप आहे. यानंतर फिर्यादींच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी तब्बल 50 लाख 27 हजार 670 रुपये विविध व्यवहारांद्वारे परस्पर काढून घेतल्याचे उघड झाले.
या रकमेतून सोन्याचे दागिने, कपडे खरेदी तसेच इतर व्यवहार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, मोबदल्याची रक्कम जमा होऊनही अनेक महिने फिर्यादींना याची माहिती मिळाली नव्हती. अखेर खात्यातील व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
यानंतर आदिवासी शेतकऱ्यांनी संबंधित दलालांविरोधात संताप व्यक्त केला असून भूमी संपादन प्रक्रियेत कार्यरत असलेल्या काही मध्यस्थांवरही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे वाढवण बंदर प्रकल्पातील भूमी संपादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास बोईसर पोलीस करत आहे.