वाडा : मच्छिंद्र आगिवले
गणेशोत्सव महिनाभरावर आला असताना वाडा तालुक्यातील मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. सुरेख मूर्तिकाम, अतिशय माफक दर, घरपोच मूर्ती पोहोचवण्याची सेवा व अतिशय उत्तम सेवा यामुळे पाली येथील कलाकेंद्र तालुक्यात नावारूपाला आले आहे. 40 वर्षांच्या या व्यवसायाची धुरा सध्या कल्पना ठाकरे या महिलेच्या हाती असून पतीच्या निधनानंतर या व्यवसायानेच त्यांना जगण्याची ताकद दिल्याचे त्या सांगतात. वाडा शहरात मूर्तींचे दर कमालीचे वाढले असताना आजही ठाकरे यांसारखे अनेक कलाकार माफक दरात मूर्ती उपलब्ध करून गोरगरिबांना दिलासा देत असल्याचे आशादायी चित्र पहायला मिळत आहे.
गणपती उत्सवात मूर्ती हे प्रमुख आकर्षण असून अलिकडे घराघरात गणपतीची स्थापना होत असल्याने हा व्यवसाय देखील विस्तारला आहे. 1985 पासून वासुदेव ठाकरे यांनी सारशी या आपल्या मूळ गावी व नंतर पाली येथे गणपती व्यवसायाची सुरुवात केली, मात्र 2018 साली त्यांचा ऐन गणपतीत मूर्तिकाम करतांना दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणतात ना जो ईश्वर दुःख देतो, तोच त्यातून सावरण्याची शक्तीही देतो. कल्पना ठाकरे यांनी आपल्या पतीपासून या व्यवसायाचे बारकावे शिकून घेतल्याने आज त्यांनी हा व्यवसाय भक्कमपणे सावरलेला आहे.
स्नेहल कलाकेंद्र या नावाने सुरू असणार्या गणपती कारखान्यात 3 कामगार वर्षभर काम करीत असून अर्धा फुटांपासून 9 फुटांपर्यंत मूर्ती येथे बनविल्या जातात. 200 रुपयांपासून 40 हजारांपर्यंत त्यांचे दर असून घरगुती मूर्ती येथे अतिशय माफक दरात उपलब्ध असतात. कल्पना ठाकरे मूर्तिकामाकडे व्यावसायिक दृष्टीने नाही तर सेवा म्हणून बघतात आणि म्हणूनच त्या 50 गावांमध्ये घरपोच मूर्ती देऊन गोरगरिबांच्या भावना जपतात. जवळपास 800 मूर्ती दरवर्षी त्या बनवितात ज्यात 50 ते 60 मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावतात.
कल्पना ठाकरे या उच्चशिक्षित असूनही नोकरीची संधी सोडून पारंपरिक व्यवसायाची गुढी उभारण्यात आपल्या पतीसोबत भक्कम उभ्या राहिल्या मात्र पतीच्या निधनानंतरही त्यांनी हा व्यवसाय चिकाटीने वृद्धिंगत करून आपल्या दोन्ही मुलींना वैद्यकीय व कला शाखेत पारंगत केले. कल्पना ठाकरे या केवळ यशस्वी व्यवसायिक नसून महिलांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहेत. वाडा तालुक्यातील गोर्हे, कुडूस, शिरीषपाडा अशा अन्य गणेशमूर्ती कार्यशाळा तितक्याच प्रसिद्ध असून सध्या सर्व कलाकार कामात मग्न आहेत.