वाडा ( पालघर ) : वाडा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून १७ प्रभाग सदस्य व जनतेतून थेट नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रचारात सर्वच पक्ष आघाडीवर असून वाहनांना लावलेले बेलगाम भोंगे रहिवाशांचे डोके उठवून देत आहेत. कधी निवडणुका होतात आणि या त्रासातून सुटका होते असे लोकं संतापाने सांगत आहेत. प्रशासनाने खरेतर आवाज मर्यादवर नियंत्रण ठेवायला हवे मात्र नियम फक्त कागदावरच असतात याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे लोक सांगतात.
नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी तब्बल ८ वर्षांनी येत असून सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार करीत आहेत. एका प्रभागात ४ ते ५ उमेदवार रिंगणात असून राजकीय पक्षांच्या बॅनर, झेंडे व स्टिकर यांनी शहराचे चित्र बदलून गेले आहे. नजर पडेल तिथे प्रचाराचीच जाहिरात डोळ्यांना दिसत असून यातील किती जणांना अधिकृत परवानगी आहे हा संशोधनाचाच भाग आहे. आपला अजेंडा लोकांना पटवून देण्यासाठी वाहनांना भोंगे बांधून वाजणारे कर्णकर्कश आवाज मात्र रहिवाशांना नकोसे झाले आहेत. एकामागे एक फिरणाऱ्या वाहनांनी बेजार केले असून सकाळपासून रात्री उशीरा पर्यंत ही वाहने त्रस्त करीत असल्याचे अनेक नागरिक सांगतात.
दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा तोंडावर असल्याने प्रचाराच्या ध्वनिप्रदूषणाने शाळकरी मुले मेटाकुटीला आली असून वृद्ध व अगदी पाळीव प्राणी देखील त्रस्त आहेत. एकदाची निवडणूक संपुदे असे साकडे अनेकजण घालीत असून प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घ्यायला हवी अशी मागणी केली जात आहे. आज प्रचार जरी थंडावणार असला तरी वैयक्तिक गाठीभेटी व छुपा प्रचार आता जोर धरणार असून वाड्यातील या निवडणुका रंगतदार होतील असे चित्र आहे.