वाडा : मच्छिंद्र आगिवले
मुबलक पाऊस व माळरान प्रदेश असल्याने वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात कसाड, भातानी, गवंढा जातीचे गवत उगवते. नागपंचमी झाली की दिवाळीपर्यंत सणांची रांग लागत असून श्रावणात उद्भवणारी बेरोजगारी व आर्थिक चणचण दूर करण्यासाठी गवत विक्री व्यवसायाचा मोठा हातभार लावतो. वाडा तालुक्यातील गवताला नाशिक, मुंबई व वसईकडे मोठी मागणी असून सध्या हा व्यवसाय तालुक्यात जोमाने सुरू आहे.
मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते मात्र याचा प्रत्यक्ष फायदा ग्रामीण भागातील लोकांना फारसा होत नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर व आर्थिक चणचण येथील जनतेच्या नशिबी कायम येते. ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात शेतीची कामे मंदावतात व याच दरम्यान प्रचंड आर्थिक मंदी ग्रामीण भागात येत असते. गवत विक्रीतून मिळणारा रोजगार मात्र आदिवासी मजुरांना मोठा दिलासा देतो. पावसाचे लवकर आगमन झाल्याने गवत देखील लवकरच उगवले असून वाड्यातील उज्जैनी, परळी, ओगदा, गारगाव या भागात मजूर गवत कापणीत व्यस्त आहेत.
गवताच्या 4 गुंड्यांची 1 धडी बनते ज्यास प्रत्येक धडीला 35 रुपये दर दिला जात असून एक मजुर दिवसभराला 250 ते 300 रूपये कमावतो. वाडा शहरातून दररोज जवळपास 20 ट्रक गवत विविध ठिकाणी विक्रीस जात असून वाड्यातील गवताला नाशिक, मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, बोरीवली, भिवंडी, आणि गुजरात येथे तबेल्यांमध्ये तसेच काही गोशाळांमध्ये मोठी मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. मजुरांचा तुटवडा व गवताचे होत असणारे कमी प्रमाण या व्यवसायासाठी भविष्यातील धोक्याची घंटा असली तरी सणासुदीच्या व बेरोजगारीच्या दिवसांत गवत कापणी मजुरांसाठी दिवाळीपेक्षा कमी नाही असे गारगाव येथील व्यापारी संतोष हरड सांगतात.