वाडा : मच्छिंद्र आगिवले
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तालुक्यासह सर्वत्रच गणेशमुर्तीच्या अखेरच्या कामांची लगबग सुरू आहे. दरवर्षी नवनवीन मुर्त्या, आकर्षक सजावट , रंगसंगती पहायला मिळतात. यंदाही अनेक मुर्त्या कार्यशाळेंमध्ये आकार घेत आहेत. तर काहीचे रंगकाम, नक्षीकाम सुरू आहे.
दरम्यान यंदा सजावट व इमिटेशन ज्वेलरीचा जास्त ट्रेंड पहायला मिळत आहे. मुत्या आकर्षक बनवण्याची जणू स्पर्धाच आहे. मात्र यात कुठेतरी पारंपारिक मुर्त्याकडे कल कमी होतो का असे वाटत आहे. यामुळेच मुर्त्यांचे दरही वाढतेच असल्याचेही चित्र आहे.
वाडा तालुक्यातील कलाकार सध्या मूर्तिकार मग्न आहेत. सोशल मीडियामुळे हल्ली पारंपरिक कामाला बगल देऊन मूर्तीच्या अवांतर सुशोभीकरणावर भर दिला जात असून इमिटेशन ज्वेलरी व कपड्यांमुळे मूर्तींचे दर गगनाला भिडल्याचे बघायला मिळत आहे. वाडा तालुक्यात वाडा शहरासह गोऱ्हे, कुडूस, पाली, शिरीषपाडा, खानिवली अशा ठिकाणी जवळपास ४० कामगार दिवसरात्र मूर्तिकामात व्यस्त असून शेकडो कामगार यात सहभागी आहेत.
तालुक्यात जवळपास २० हजार मूर्तींची स्थापना होत असून १ फुटांपासून ८ ते १० फुटांपर्यंत मूर्ती बनविल्या जातात. पेण येथून कच्च्या मूर्ती बहुतेक कारागीर आणत असून तिथेही मूर्तींचे दर व वाहतूक वाढल्याने कारागीर बेजार आहेत. ग्राहक आजकाल सोशल मीडियावर आपली मूर्ती, रंग व सजावट पसंत करतात.
कलाकारांना देखील ग्राहक टिकविण्यासाठी मागतील तश्या मूर्ती बनवायला भाग पडत असून फेटे, धोतर, ज्वेलरी व अन्य सजावट करावी लागते असे काही कलाकार सांगतात. मूर्तींचे दर यामुळे मागील काही वर्षात गगनाला भिडले असून अवांतर सजावटीमुळे मूळ किंमतीच्या दीड ते दोन हजारांनी मूर्तींचे दर वाढल्याचे कलाकार कुलदीप दिवटे सांगतो.
कुलदीप हा वाड्यातील अत्यंत गुणी कलाकार असून मागील अनेक वर्षांपासून तो या मुर्ती व्यवसायात आहे. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्यावर त्याचा अधिक भर असून मातीच्या मिळून तो केवळ शंभर मुर्त्या बनवितो. बाप्पांच्या प्रत्येक मूर्तीत तो जीव ओतण्याचा प्रयत्न करीत असून महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्याच्या या मूर्तींना मोठी मागणी आहे. मात्र ग्राहकांच्या हट्टापुढे व्यावसायिकांना हतबल होण्याची वेळ आली असून पर्यावरण पुरक नसतांनाही ज्वेलरी व विविध सजावट कलाकारांना हाती घ्यावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.