वाडा वनविभागात उभारले जातेय निकृष्ट बंधार्‍यांचे जंगल  pudhari photo
पालघर

Poor quality check dams : वाडा वनविभागात उभारले जातेय निकृष्ट बंधार्‍यांचे जंगल

गॅबीयन बंधार्‍यांकडे वन विभागाचा कलही संशयास्पद

पुढारी वृत्तसेवा
वाडा : मच्छिंद्र आगिवले

वाडा तालुक्यातील जंगलात हळूहळू झाडांपेक्षा बंधारे जास्त होतील अशी अवस्था असून जंगलात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या ब्रिदवाक्याच्या नावाखाली काँक्रीटचे जणू जंगल उभे केले जात आहे. जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून शक्यतो 10 लाखांच्या आतील रक्कमेचे काम उभे केले जाते ज्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागत नाही असे जाणकार सांगतात. अतिशय निकृष्ट दर्जाची व कामचलाऊ कामे वाडा तालुक्यातील जंगलात पहायला मिळत असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी सर्व बंधार्‍यांची तपासणी करावी अशी मागणी केली जात आहे.

वृक्षांचे संवर्धन, लागवड व वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी खरेतर वनविभागाची स्थापना झाली मात्र सध्या वनविभाग जणू फक्त बंधारे बांधण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. वाडा तालुक्यातील जंगलात यामुळे काँक्रीटचा अक्षरशः कचरा निर्माण होत असून यावर लगाम घालणे गरजेचे आहे असे लोकांचे म्हणणे आहे. जंगलात हल्ली जागोजागी सिमेंट व गॅबीयन बंधारे बांधून जल संधारणाचे काम केले जात असल्याचा बागुलबुवा उभा केला जातो मात्र निकृष्ट दर्जाची कामे व चुकलेली जागा निवड यामुळे अनेकदा नोव्हेंबर पासून बंधारे कोरडे पडतात हे वास्तव आहे.

वाड्यातील जंगलात सध्या मुबलक पाऊस पडत आहे मात्र अनेक बंधारे अतिशय कुचकामी असल्याने बंधार्‍यांच्या बाजूने पाणी धोधो वाहून जात असल्याचे पाहायला मिळते. मृदा व जल संधारणासाठी गॅबीयन बंधारे महत्त्वाचे मानले जात असून जागोजागी ते पहायला मिळतात. गॅबीयन बंधार्‍यात जंगलातील दगड शोधून त्यांची मोट बांधली जाते ज्यासाठी फारसा खर्च येत नसल्याने अधिकार्‍यांचा देखील याच बंधार्‍यांकडे ओढा असल्याचे बोलले जात आहे. 10 लाखांच्या आतील कामात कसेही काम करा व बक्कळ पैसे मिळवा असा हेतू असल्याने कंत्राटदार लॉबी सध्या वन विभागाकडे पिंगा घालीत आहे असा आरोप केला जातो.

झालेल्या कामांचा आढावा घेण्याची मागणी

जव्हार येथील उप वनसंरक्षकांनी वाडा वन विभागात झालेल्या सर्व बंधार्‍यांच्या कामांचा आढावा घेऊन प्रत्येक बंधार्‍याची पाहणी करण्याची मागणी केली जात आहे. यासोबत संरक्षक कुटी, निरीक्षण टॉवर व अन्य सर्व कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. काही विशिष्ट कंत्राटदार वनविभागात कामे करीत असल्याचा संशय असून वन विभागातील गॅबीयन बंधार्‍यांची कामे स्थगित करून झालेल्या कामांचा आढावा आधी घ्यावा अशीही मागणी केली जात आहे.

उज्जैनी गावात बंधार्‍यांचा पूर

वाडा तालुक्यातील उज्जैनी गावाच्या हद्दीत एकाच ओहोळावर जवळपास 10 ते 12 बंधारे एकाजवळ एक उभारण्यात आलेले पहायला मिळत असून यातील अनेक बंधारे कुचकामी झाल्याने असून नसल्यासारखे झाले आहेत. वन विभागासह काही संस्थानी हे काम केल्याचे स्थानिकांनी सांगितले असून एकही बंधार्‍याचा लोकांना हवातसा फायदा होत नसल्याने यात कुणाचे उखळ पांढरे झाले असा सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT