वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा  pudhari photo
पालघर

Bad roads in Wada town : वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

गार्डन भूखंडात रस्त्याने अतिक्रमण केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

वाडा : वाडा शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो मात्र शहरातील रस्त्यांची अवस्था अल्पावधीतच भयावह झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने कंत्राटदार मनमानी कारभार करतात ज्याचा मनस्ताप सामान्य जनतेला सोसावा लागतो असा आरोप केला जात आहे.

हनुमान मंदिराच्या मागे तीन रस्ते एकाच ठिकाणी जोडतात मात्र तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांनी केलेल्या रस्त्याच्या कामात चढउतार दिसत असून जणू अपघातांना हे आमंत्रण दिले जात आहे. शहरातील सर्व रस्ते व विकासकामांची तपासणी वरिष्ठ पातळीवरून करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

शहरातील वर्षभरात बनविलेल्या मार्गांची अवस्था अतिशय बोगस झाली असून निकृष्ट कामामुळे खड्डे, काँक्रिटला पडलेल्या भेगा व उडालेली आच्छादने, नकोतिथे गतिरोधक, गटारांची अपूर्ण कामे, रस्त्यावर साचणारे पाणी अशा अनेक कारणांमुळे स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.

कोट्यवधींच्या निधीला कुणीही वाली नसल्याने कंत्राटदार वाटेल तशी कामे रेटून नेतात असाही लोकांचा आरोप आहे. नुकताच बनविलेल्या हनुमान मंदिराच्या मागील मार्गावर खड्ड्यांची चादर पसरली असून याच भागात दोन मार्गांना जोडणार्‍या ठिकाणी अर्धा फुटांची धोकादायक तफावत आढळून येते.

पीक कॉलनी भागात सुरू असलेल्या रस्त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला असून गार्डन भूखंडातून रस्ता बनविला जात असल्याने त्याला विरोध केला जात आहे. गार्डन भूखंडाची आधी मोजणी करा मग प्रस्तावित जागेतून रस्त्याचे काम करा अशी मागणी करणारे पत्र नगरपंचायतीला देण्यात आले असून कुणाचीही मनमानी सहन केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT