Virar Dahanu Railway Pudhari
पालघर

Virar Dahanu Railway: विरार -डहाणू रेल्वे मार्ग चौपदरीकरणाचे काम लांबणीवर; डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार चौपदरीकरण पूर्णत्वाच्या मुदतीत वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

सफाळे: विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याच्या मुदतीत वारंवार बदल होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन डहाणू लोकलच्या किमान पाच अप आणि पाच डाऊन फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार चौपदरीकरण पूर्णत्वाच्या मुदतीत वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला मार्च २०२३, त्यानंतर मार्च २०२७, जून २०२७, एसआरयूसीसी बैठकीदरम्यान मार्च २०२८ आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पॉडकास्टमध्ये मार्च २०२९ अशी विविध मुदती समोर आल्याचे दयानंद पाटील यांनी म्हटले आहे.

त्यामुळे चौपदरीकरणाच्या पूर्णत्वाची मुदत सातत्याने पुढे ढकलली जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, विरार-डहाणू मार्गावरील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या उपलब्ध असलेल्या लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे.

वाढवण बंदर, बोईसर औद्योगिक क्षेत्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, प्रस्तावित विमानतळ, बुलेट ट्रेनचे बोईसर स्थानक तसेच वाढते नागरीकरण यामुळे भविष्यात या मार्गावरील प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

डहाणूहून मुंबईकडे जाणाऱ्या अतिरिक्त फेऱ्या पहाटे ३.५०, सकाळी ७.४०, सायंकाळी ४.४५, सायंकाळी ६.१५ आणि रात्री ११.३० वाजता, तर विरारहून डहाणूकडे जाणाऱ्या फेऱ्या सकाळी ७.३०, दुपारी २.३०, सायंकाळी ५.३०, रात्री ८ आणि रात्री १०.१५ वाजता सुरू करण्याची मागणी आहे. तसेच चर्चगेटहून रात्री ११ वाजता डहाणूसाठी स्वतंत्र लोकल सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खासदारांनी रेल्वेकडे पाठपुरावा करावा

पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये लागू होत असल्याने पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी दयानंद पाटील यांनी केली आहे.

सामान्य नोकरदार, भाजी व दूध विक्रेते, विद्यार्थी तसेच दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत वाढीव लोकल फेऱ्यांचा समावेश नवीन वेळापत्रकात करावा, अशी प्रवाशांची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT