विक्रमगड ः सचिन भोईर
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विक्रमगड तालुक्यात थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, याचा सकारात्मक परिणाम रब्बी हंगामातील कडधान्य पिकांवर दिसून येत आहे. अधूनमधून पडणारे धुके, कोरडे हवामान व रात्रीची कडाक्याची थंडी यामुळे वाल, हरभरा, पावटे, मूग, चवळी व उडीद या कडधान्य पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी अनेक भागात ही पिके चांगली बहरली असून, तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
विक्रमगड तालुक्यात भात हे मुख्य खरीप पीक असले तरी दिवाळीनंतर अनेक शेतकरी रब्बी हंगामात कडधान्य पिकांची लागवड करतात. चालू हंगामातही भात काढणीनंतर शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर कडधान्य पिकांची लागवड केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, ढगाळ व दमट हवामान यामुळे कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. त्यामुळे यंदाही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम होईल की काय, अशी भीती शेतकरी वर्गात होती.
दरम्यान, जानेवारी महिन्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे चित्र पालटले. आकाश स्वच्छ राहणे, सकाळी हलके धुके आणि रात्री कडाक्याची थंडी यामुळे कडधान्य पिकांची वाढ जोमाने होऊ लागली. विशेषतः हरभरा व वाल या पिकांना फुलोरा व शेंगा धरू लागल्याने उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. काही भागांत मूग, चवळी व उडीद पिकेही चांगल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील अनेक शेतकरी सांगतात की, जर पुढील काही दिवस असेच कोरडे व थंड वातावरण राहिले, तर कडधान्य पिकांचे उत्पादन समाधानकारक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
यावर्षी भात पिकानंतर मी शेतात मूग, तूर व वाल या कडधान्य पिकांची लागवड केली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ व दमट वातावरणामुळे पिकांवर परिणाम होईल, अशी भीती वाटत होती. मात्र जानेवारीत कडाक्याची थंडी आणि पोषक वातावरण मिळाल्याने कडधान्य पिके चांगली बहरली आहेत. यामुळे समाधान वाटत आहे.माणिक सांबरे, शेतकरी, विक्रमगड