बोईसर ः तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने अवजड वाहने मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच नागझरी येथे झालेल्या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर आदळून पीकअप जीपमधील चालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दररोज हजारोंच्या संख्येने ट्रक व कंटेनर तारापूर एमआयडीसीत ये-जा करत असून, वाहनतळाची सुविधा नसल्याने मुकुट टँक ते नागझरी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रक थांबवले जातात. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
बोईसर-पालघर रस्त्यालगतचा एएम-37 क्रमांकाचा 23 हजार चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असला तरी सध्या त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहनतळ उभारणीस अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, औद्योगिक वसाहतीच्या मध्यवर्ती भागात असलेला ओएस-1/ए क्रमांकाचा 22,234 चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी अधिक उपयुक्त मानण्यात आला असून, त्या ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून, या ठिकाणी ट्रक टर्मिनलबरोबरच चालकांसाठी विश्रांतीगृह, उपहारगृह व स्वच्छतागृहाची सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.
ओएस-1/ए भूखंडावर ट्रक टर्मिनलसाठी आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव पाठवला असून, पुढील एक-दोन महिन्यांत यावर निर्णय अपेक्षित आहे.अविनाश संखे, उप अभियंता, तारापूर एमआयडीसी