पालघर : भारतीय प्रशासन सेवेतील तरुण अधिकारी विकास खत्री यांची मंगळवारी (दि.१५) डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली आहे. विद्यमान प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विकास खत्री यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी खत्री हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी होते. डहाणूचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांची बदली सांगली- मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी वर्गाची बदली मंगळवारी करण्यात आली यामध्ये सत्यम गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी सत्यम गांधी यांनी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रभार स्वीकारला होता. त्यानंतर आता त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विशाल खत्री येणार आहेत. खत्री हे २०२२ च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासन सेवेत अधिकारीपदी रुजू झाले.
विशाल खत्री हे मूळचे बिहार राज्यातील आहेत. नववीमध्ये असताना त्यांचे बांधकाम मजूर वडील दीनानाथ यांचा २००८ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी जिद्दीने व अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली व त्यात ते यशस्वी झाले. बिहार पाटणा येथील वंचिताना शिक्षण देणाऱ्या सुपर थर्टीचे गणित्तज्ञ अमित कुमार यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये खत्री यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांनी संघर्ष करून जिद्दीने अभ्यास करत आयआयटी कानपुरमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले व आयएएस झाले. पतीच्या निधनानंतर विशाल यांच्या आईने घर चालवण्यासाठी आणि घरातील तीन मुलांच्या शिक्षणासाठी गुरेढोरे पालन, शेळ्या आणि म्हशी पाळण्याचे काम केले.