Smart Meter  pudhari photo
पालघर

Mahavitaran Smart Meter: स्मार्ट मीटरचा मुद्दा वसई-विरारमध्ये चर्चेचा विषय

स्मार्ट मीटरच्या माध्यमातून भविष्यात दरवाढीचा अतिरिक्त भार ग्राहकांवर पडण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा: वसई-विरार परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप होण्यासोबतच ग्राहकांच्या वीजबिलात पारदर्शकता येत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून भविष्यात वीजदरवाढीचा अतिरिक्त भार ग्राहकांवर पडण्याची शक्यता असल्याचा आरोप करत विरोधकांनी या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता वसई-विरारमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील सुमारे ५ लाख ग्राहकांना स्मार्ट मीटरचा लाभ मिळत असून, या माध्यमातून तब्बल १३ कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची नोंद अधिक अचूकपणे करता येते. तसेच मीटर रीडिंगसाठी प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होत असल्याने बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढते, असे महावितरणचे म्हणणे आहे.

स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने किती वीज वापरली, कोणत्या कालावधीत वापर वाढला किंवा कमी झाला, याची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनाही आपल्या वीज वापरावर लक्ष ठेवणे आणि अनावश्यक वीजखर्च कमी करणे शक्य होते. परिणामी वीज बचतीला चालना मिळत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वीजचोरीला आळा घालण्याचाही दावा

स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती अधिक अचूकपणे उपलब्ध होत असल्याने वीजचोरी तसेच मीटरमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होऊ शकते. वीज वितरण व्यवस्थेतील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा महावितरणचा दावा आहे.

मात्र, दुसरीकडे स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्याची गरज असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली भविष्यात वाढीव वीजदर किंवा अतिरिक्त आर्थिक भार ग्राहकांच्या माथी मारला जाऊ नये, अशी मागणीही केली जात आहे.

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’

स्मार्ट मीटरबाबत विविध प्रकारच्या अफवा आणि गैरसमज पसरत असल्याने ग्राहकांनी त्यावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटरचा उद्देश ग्राहकांना अधिक अचूक, पारदर्शक आणि आधुनिक वीज वितरण व्यवस्था उपलब्ध करून देणे हा असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, ५ लाख ग्राहकांना १३ कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा आणि विरोधकांकडून व्यक्त करण्यात येणाऱ्या शंका यामुळे वसई-विरारमधील स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्षात ग्राहकांना किती फायदा होतो आणि भविष्यात त्यांच्या वीजबिलावर त्याचा काय परिणाम होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT